D K Shivkumar Cabinet Expansion Politics : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. या विस्तारामध्ये तब्बल 20 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मात्र, काही ज्येष्ठ आणि महत्त्वाकांक्षी आमदारांना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी थेट नाराजी व्यक्त केली, तर काहींनी आपल्या आमदारकीचाच राजीनामा देऊन टाकला. पण आता तेच आमदार आपली आमदारकी वाचवण्यासाठी धावाधाव करताना दिसत आहेत.
याच आठवड्यात (ता. 3) इंडीचे आमदार यशवंतराय गौडा व्ही. पाटील यांनी विधानसभेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. पण आता त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपला राजीनामा स्वीकारू नये, अशी विनंती केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, त्यांनी घेतलेल्या यू-टर्नची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.
काँग्रेसच्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या इंडी मतदारसंघाचे काँग्रेस आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. तर नाराज आमदार बेलूर गोपालकृष्ण यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी मंत्रिपद न मिळाल्याने काही आमदारांच्या समर्थकांनी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. तसेच पक्ष नेतृत्वाविरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला होता. यामुळे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस नेतृत्वासमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले होते. तसेच कर्नाटकात काँग्रेसमध्ये सुरू असलेली धुसफूस उघड झाली होती.
दरम्यान, आता मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होऊन आमदारकीचा राजीनामा देणारे इंडी मतदारसंघाचे काँग्रेस आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी यू-टर्न घेतला आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपला राजीनामा स्वीकारू नये, अशी विनंती केली आहे.
पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यावेळी, "हा निष्ठावंत आणि प्रामाणिक लोकांचा काळ नाही. मोठे षड्यंत्र सुरू आहे. या घडामोडींमुळे मला प्रचंड मानसिक वेदना झाल्या आहेत," अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. तसेच, "मंत्रीपदाचे आश्वासन मिळाले होते. यादीत नावदेखील होते, पण शेवटी ते वगळण्यात आले," असा दावाही त्यांनी केला होता.
ज्यानंतर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी या धुसफुशीच्या राजकारणावर भाष्य करत प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटले, "राजीनामे देणे हा राजकारणाचाच एक भाग असून, ज्यांना राजीनामा द्यायचा आहे, त्यांना आपण कोणीही रोखू शकत नाही. जर त्यांना पक्ष आणि राजकीय भवितव्य हवे असेल, तर त्यांनी पक्षातच राहिले पाहिजे. पक्ष असेल तरच बाकी सर्व गोष्टी साध्य होतात. धर्मसिंह आणि सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात मला मंत्रिपद मिळाले नाही, तेव्हा मीसुद्धा राजीनामा देऊ शकलो असतो. पण मी आणि जी. परमेश्वर यांनी संयम राखला. आता सर्वांनी संयम ठेवावा, संधी नक्कीच मिळेल," असे आवाहनही त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.