D. K. Shivakumar, NCP Chief Sharad Pawar
D. K. Shivakumar, NCP Chief Sharad Pawar Sarkarnama
देश

पवारांनी कर्नाटकात पाऊल ठेवताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार भेटीला

सरकारनामा ब्युरो

बेंगलुरू : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज कर्नाटक दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पक्षाच्या बेंगलुरूमधील कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

कर्नाटकात (Karnataka) पुढील वर्षाच्या सुरूवातीला विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीकडूनही आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यापार्श्वभूमीवर बेंगलुरूमधील बनसवाडी येथील कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते आज होणार आहे. त्यासाठी पवारांचे दुपारी बेंगलुरू विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर शिवकुमारांनी त्यांची भेट घेतली. याबाबत त्यांनीच ट्विटरवरून माहिती दिली आहे. पवारांसोबतच्या भेटीचा फोटोही त्यांनी ट्विट केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही या भेटीचे फोटो फेसबुकवर टाकण्यात आले आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगितले जात आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आहेत. भाजपविरोधी आघाडीत पवारांच्या भूमिकेला महत्व असतं. त्यामुळे कर्नाटकात आगामी निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का, याकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, कर्नाटकातही मराठी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पवारांनी प्रामुख्याने या भागावर लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले जात आहे. 2018 मध्येही राष्ट्रवादीचे उमेदवार विधानसभेच्या रिंगणात होते. रायबागा हुकेरी, बेळगाव उत्तर, सवादत्ती, विजयपुरा, सिंदगी, बसवकल्याण, रायचूर, शिराहत्ती, हुबळी-धारवाड, कारवार, बेल्लारी नगर, हरपनहल्ली आणि बेंगलुरूमधील महालक्ष्मी या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार होते.

आगामी निवडणुकीत बेंगलुरू शहरासह महाराष्ट व कर्नाटक सीमेवरील मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवार उभे केले जाऊ शकतात. त्यामुळे पवारांच्या आजच्या कर्नाटक दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. कर्नाटकात सध्या भाजपची सत्ता आहे. तर काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष असून धर्मनिरपेक्ष जनता दल (JDS) चीही मोठी ताकद आहे. भाजप सत्तेत येण्याआधी तिथे काँग्रेस व जेडीएसने हातमिळवणी केली होती. पण त्यांचं सरकार फारकाळ टिकलं नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT