Congress allegations vote fraud : बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा दारूण पराभव झाला आहे. विरोधकांसाठी बिहारचा निकाल धक्कादायक असाच आहे. या निकालानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक निष्पक्ष झाली नाही, असा आरोप केला आहे. त्याआधी त्यांनी बिहारच्या निवडणुकीत ‘मतचोरी’ होऊ शकते, असा दावा केला होता. मागील काही महिन्यांपासून याच मुद्द्यावरून ते सातत्याने भाजप आणि भारतीय निवडणूक आयोगावर निशाणा साधत आहेत.
बिहार निवडणुकीत पदरी निराशा पडल्यानंतर आता राहुल गांधींसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटकातील ही मोठी घडामोड आहे. ‘मतचोरी’ प्रकरणात देशातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासही सुरू केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्या आरोपांमध्ये सत्यता समोर येणार आहे.
कर्नाटकातील इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू असे तक्रारदाराचे नाव आहे. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान महादेवपुरा मतदारसंघात मतचोरी झाल्याचा आरोप राजू यांनी तक्रारीत केला आहे. मतदारयादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ करून बोगस मतदारांचे नाव बेकायदेशीरपणे समाविष्ट करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
मतदारयादीमध्ये बोगस मतदार घुसविण्याचे काम काही राजकीय पक्षांचे सदस्य, सरकारी अधिकारी आणि काही खासगी व्यक्तींनी केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी महादेवपुरा मतदारसंघातील मतदारयाद्यांमधील कथित घोळाप्रकरणी पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप केले होते.
भाजपचे सरकार मतचोरी करून निवडून आल्याचा आरोप राहुल गांधी यांच्याकडून केला जात आहे. त्यासाठी त्यांनी महादेवपुराचे उदाहरण दिले होते. तसेच बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाआधीही त्यांनी पत्रकार परिषदेत हरियामातील मतदारयाद्यांमधील कथित घोळावर बोट ठेवले होते. भाजप आणि निवडणूक आयोगाकडून एकत्रितपणे हे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप राहुल यांच्याकडून केला जात आहे.
आता कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्राथमिक तपास सुरू केला आहे. त्यामुळे यामध्ये पोलिसांच्या हाती कोणते घबाड लागणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसकडून पुन्हा मतचोरीचा राग आळवण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत दिल्लीत मतचोरीविरोधात मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.