<div class="paragraphs"><p>D K Suresh and Ashwath Narayan</p></div>

D K Suresh and Ashwath Narayan

 

Sarkarnama 

देश

मुख्यमंत्र्यांसमोर स्टेजवरच काँग्रेसचे खासदार अन् आमदार मंत्र्यांच्या अंगावर गेले धावून!

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : कर्नाटकचे (Karnataka) माहिती तंत्रज्ञान मंत्री सी. एन. अश्वथ नारायण (C. N. Ashwath Narayan) आणि काँग्रेसचे बेंगलुरू ग्रामीणचे खासदार डी. के. सुरेश (D. K. Suresh) हे दोघे मुख्यमंत्र्यांसमोबर स्टेजवरच भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. एका कार्यक्रमात खासदार सुरेश हे थेट मंत्र्यांच्या अंगावर धावून गेल्याने खळबळ उडाली. त्यामुळे कार्यक्रमात मोठा गोंधळ निर्माण झाला. अचानक घडलेल्या या प्रकाराने मुख्यमंत्रीही गोंधळून गेले.

रामनगर येथे सोमवारी सरकारतर्फे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) उपस्थित होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच रामनगरमध्ये आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) आणि केम्पेगौडा यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात अश्वथ नारायण हे भाषण करत असताना अचानक काँग्रेसचे खासदार त्यांच्या अंगावर धावून गेले. सुरेश हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) यांचे बंधू आहेत.

दोघांमध्ये काहीवेळ बाचाबाचीही झाली. पण सुरेश यांचा आक्रमक पवित्रा पाहून सुरक्षारक्षकांनी लगेच त्यांना अडवले. त्यानंतर काँग्रेस आमदार एस. रवी त्यांच्या मदतीला धावून गेले. त्यांनी नारायण यांचा माईक हिसकावून घेण्याचाही प्रयत्न केला. यावेळी स्टेवर एकच गोंधळ निर्माण झाला. भाजपचे काही पदाधिकारीही मागे जागेवरून उठून नारायण यांच्या बाजूने आले.

या प्रकारानंतर संतापलेले काँग्रेसचे खासदार स्टेजवरच आंदोलनाला बसले. मुख्यमंत्र्यांसमोरच हा सर्व प्रकार सुरू होता. भाषणादरम्यान नारायण यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. केवळ मतं घेतात, पण काम काहीच करत नाहीत. पण आम्ही त्यासाठी इथे आलो नाही. इथल्या लोकांचा विकास करण्यासाठी आलो आहेत. इतरांच्या जमिनी बळकावणारे आम्ही नाही, अशी टीका नारायण यांनी केली होती. त्यामुळे खासदार सुरेश भडकल्याची चर्चा आहे.

कार्यक्रमामध्ये बोलताना सुरेश यांनी नारायण यांच्यावरच आरोप केला. राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची उभारणी त्यांच्यामुळेच थांबले. तेच या विलंबाला जबाबदार आहेत. जिल्ह्याच्या विकासाआड कोणतंही राजकारण न आणता आम्ही एकत्रितपणे काम करत आहोत, असेही सुरेश म्हणाले. कार्यक्रमानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नारायण यांचे पोस्टर फाडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT