बेंगलुरू : देशात कोरोना (Corona) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराने शिरकाव केले आहे. कर्नाटकात (Karnataka) या विषाणुची बाधा झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. पण त्यापैकी एक रुग्ण पाच दिवसांपूर्वीच दुबईला (Dubai) पळून गेला आहे. त्यावरून आता प्रशासनाची झोप उडाली आहे. रुग्णाने खासगी लॅबमध्ये केलेल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह होता. या लॅबसह संपूर्ण प्रकरणाचीच उच्च स्तरीय चौकशी केली जाणार आहे.
जगभरात आतापर्यंत 29 देशांमध्ये ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे. त्यामध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे. जगात या विषाणुचे कालपर्यंत 373 रुग्ण आढळून आले होते. भारतात आढलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण कर्नाटकातील डॉक्टर आहे. तर दुसरा रुग्ण 20 तारखेला दक्षिण आर्फिकेतून दुबईमार्गे कर्नाटकात आला होता. त्याची सरकारी लॅबमध्ये केलेली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याने खासगी लॅबमध्ये चाचणी केली होती.
या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. हाच अहवाल दाखवून तो दुबईला पळाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता प्रशासनाने या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कर्नाटकचे मंत्री आर. अशोक म्हणाले, आरटी-पीसीआर अहवालांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. संबंधित व्यक्ती हॉटेलमध्ये थांबला होता. त्याचे काम झाल्यानंतर तो दुबईला गेला. त्याच्याकडे एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह अहवाल होता. हे संशयास्पद असल्याने संबंधित लॅबचीही चौकशी केली जाणार आहे. पोलिस आयुक्तांच्या देखरेखीखाली ही चौकशी होईल, असंही आर. अशोक यांनी स्पष्ट केलं.
दुबईला पळालेल्या रुग्णाविषयी
हा रुग्ण 66 वर्षांचा आहे. तो 20 तारखेला बेंगलुरू विमानतळावर उतरला होता. येताना त्याने कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट आणले होते. पण भारतात चाचणी केल्यानंतर त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल आला. मात्र त्याला कोणतीही लक्षणे नव्हती. त्यावेळी तो एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी करत 22 तारखेला त्याचे नमुने जनुकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. त्याला हॉटेलमध्ये थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता.
यादरम्यान रुग्णाने 23 तारखेला खासगी लॅबमध्ये पुन्हा चाचणी केली. त्याचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतर 27 तारखेला मध्यरात्री तो कॅबने विमानतळावर गेला. तिथून तो विमानाने दुबईला गेल्याची माहिती आहे. त्यावरून वादळ उठले आहे. हा रुग्ण यंत्रणेला माहिती न देताच गेल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.