Karnataka Political News : बस प्रवासात सुट्ट्या पैशांवरून वाद आणि भांडणाचे प्रकार अनेकदा घडत असतात. याचा त्रास अनेकदा प्रवाशांना सहन करावा लागतो. पण आता याच कारणामुळे थेट कर्नाटकच्या परिवहन मंत्र्यांनाच चालत्या बसमधून खाली उतरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून संबंधित बस चालक आणि कंडक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे कर्नाटक परिवहन मंडळ आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बंगळुरू शहरात बस प्रवासादरम्यान सुट्ट्या पैशांवरून अनेकदा वाद होत असल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या होत्या. यामागील नेमके वास्तव जाणून घेण्यासाठी परिवहन मंत्री बायराथी सुरेश यांनी शनिवारी रात्री छुप्या वेषात एका सामान्य प्रवाशाप्रमाणे प्रवास केला. हेब्बाल ते नागशेट्टीहल्ली या मार्गावर बेंगळुरूच्या BMTC बसने प्रवास करताना त्यांना हा धक्कादायक अनुभव आला. मंत्री सुरेश यांनी तोंडाला मास्क लावल्याने त्यांना कोणीही ओळखू शकले नाही.
यावेळी बस कंडक्टरने तिकिटासाठी सुट्टे पैसे मागितले. मंत्री सुरेश यांनी तिकीट काढण्यासाठी १०० रुपयांची नोट दिली. मात्र, कंडक्टरने सुट्टे पैसे नसल्याचे कारण सांगत त्यांना तिकीट देण्याऐवजी थेट चालत्या बसमधून उतरून जाण्यास सांगितले. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना आला.
या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अवघ्या दोन तासांतच संबंधित बस चालक आणि कंडक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. सुट्टे पैसे नसल्याच्या कारणावरून प्रवाशाला बसमधून खाली उतरवणाऱ्या चालक आणि कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, मंत्री सुरेश यांना फक्त बस प्रवासातील मनस्तापाचाच अनुभव आला नाही, तर ऑटो-रिक्षा चालकांकडून होणाऱ्या अतिरिक्त वसुलीचाही अनुभव आला. बसमधून खाली उतरवल्यानंतर त्यांनी नागशेट्टीहल्ली येथे एका ऑटो-रिक्षा चालक आणि प्रवाशामधील वादात हस्तक्षेप केला. त्या रिक्षाच्या मीटरवर ३० रुपये भाडे दिसत असतानाही चालक प्रवाशाकडून ३६ रुपयांची मागणी करत होता. यावरून तो प्रवाशाशी हुज्जत घालत होता.
या सर्व प्रकारानंतर परिवहन मंत्री बायराथी सुरेश यांनी सांगितले की, त्यांनी जवळपास दोन तासांत १० पेक्षा अधिक बसमधून प्रवास केला आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. आता कर्मचाऱ्यांमध्ये अधिक शिस्त आणण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर करण्यासाठी आकस्मिक तपासण्यांसह आणखी कडक पावले उचलण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.