KP Sharma Oli Sarkarnama
देश

Nepal Political News : नेपाळचा अजब कारभार; 16 वर्षांत 13 सरकार! के. पी. शर्मा ओली तिसऱ्यांदा पंतप्रधान

Sandeep Chavan

नेपाळ! या देशातली 239 वर्षांची राजेशाही 2008 मध्ये संपुष्टात आली आणि पहिल्यांदाच लोकशाही सरकारची स्थापना झाली, मात्र तेव्हापासून आजअखेर म्हणजे गेल्या 16 वर्षांत या देशात तब्बल 13 सरकारं पाहायला मिळाली.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (युनिफाईड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) चे अध्यक्ष के. पी. शर्मा ओली यांनी सत्तेवर दावा केला असून ते लवकरच नवं सरकार स्थापन करणार आहेत. के. पी. शर्मा ओली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत.

नेपाळमध्ये पुन्हा एकदा ओली सरकार!

कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (युनिफाईड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) चे अध्यक्ष के. पी. शर्मा ओली आता नेपाळचे Nepal नवे पंतप्रधान असणार आहेत. लवकरच ते नवं सरकार स्थापन करतील. नेपाळचे विद्यमान पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांना संसदेत अविश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्यानंतर के. पी. शर्मा ओली यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला.

कोण आहेत के. पी. शर्मा ओली?

  • 1952 मध्ये पूर्व नेपाळमध्ये जन्म

  • कम्युनिस्ट विचारसरणीचे नेते

  • 2015 - 16 आणि 2018 - 21 या कार्यकाळात दोन वेळा भूषवलं पंतप्रधानपद

  • भारताविषयी कठोर भूमिका, चीनधार्जिणे नेते

  • वयाच्या 12 व्या वर्षापासून राजकारणात सक्रिय

  • कार्ल मार्क्स आणि लेनिन या दोघांपासून प्रभावित

  • विविध प्रकरणांत अनेकदा तुरुंगवास

  • लोकशाही चळवळीतील सक्रिय सहभागामुळं प्रसिद्धी

  • 1991 मध्ये पहिल्यांदा नेपाळच्या संसदेत लोकप्रतिनिधी म्हणून दाखल

  • 2006 मध्ये कोईराला यांच्या अंतरिम सरकारमध्ये उपपंतप्रधान म्हणून काम

2015 मध्ये के. पी. शर्मा ओली पहिल्यांदा पंतप्रधानपदी

2008 मध्ये नेपाळनं आपली 239 वर्षांची राजेशाही संपुष्टात आणत स्वत:ला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केलं आणि 2015 मध्ये के. पी. शर्मा ओली KP Sharma Oli पहिल्यांदा नेपाळचे पंतप्रधान झाले मात्र ते काही जास्त काळ या पदावर राहू शकले नाहीत.

जुलै 2016 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओईस्ट सेंटर) या त्यांच्या सहकारी पक्षानं त्यांचा पाठिंबा काढून घेतला. ओली पंतप्रधानपदी असताना नेपाळ आणि भारत या दोन्ही राष्ट्रांदरम्यानचे संबंध फार काही चांगले राहिले नाहीत याउलट या काळात नेपाळचे चीनबरोबरचे संबंध अधिक दृढ झाले होते.

2018 मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी

2018 मध्ये ओली दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांचा कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट) आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओईस्ट सेंटर) या दोन पक्षांनी मिळून संसदेत दोन-तृतीयांश मतं मिळवल्यानंतर हे दोन्हीही पक्ष आपापसांत विलीन झाले आणि नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचा उदय झाला.

ओली आणि दहल यांनी आपापसांत वाटाघाटी करून पंतप्रधानपद वाटून घेण्याचं मान्य केलं मात्र स्पष्ट जनादेश असतानाही नेपाळमध्ये आर्थिक समृद्धी किंवा राजकीय स्थैर्य आणण्यात सरकार अपयशी ठरलं.

पंतप्रधानपद वाटून घेऊ, असं ठरलेलं असतानाही जेव्हा पंतप्रधानपद दहल यांच्याकडं सोपवण्याची वेळ आली तेव्हा ओली यांनी पंतप्रधानपद दहल यांच्याकडं देण्यास नकार दिला आणि पक्षात फूट पडली.

परिणामी, दहल यांच्या गटानं सरकारचा पाठिंबा काढून घेतला. ओली यांनी 2020 व 2021अशी दोनदा संसद बरखास्त केल्यानंतर न्यायालयानं नॅशनल काँग्रेसचे शेर बहादूर देउबा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याचचा आदेश दिला.

ओली तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान

आता विराजमान होणार आहेत. यावेळी त्यांनी नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचे जुने प्रतिस्पर्धी देउबा यांच्यासोबत सत्तावाटपाचा करार केला आहे. करारानुसार, ओली सुरुवातीचे 22 महिने पंतप्रधान राहातील तर त्यानंतर देउबा पंतप्रधानपदी विराजमान होतील.

एकूणच काय तर नेपाळमध्ये 1990 पासून आजअखेर एकाही सरकारला संपूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. नेपाळचा आजवरचा राजकीय इतिहास पाहाता, नेपाळी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (युनिफाईड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) या दोन पक्षांची युती किती काळ सत्तेत टिकून राहील याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT