Nitish Kumar
Nitish Kumar  Sarkarnama
देश

इस उम्र में भी चच्चा बदनाम है! भाजपच्या महिला आमदारामुळं मुख्यमंत्री अडचणीत

सरकारनामा ब्युरो

पाटणा : बिहारमध्ये (Bihar) संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजपचे (BJP) सरकार आहे. सत्तेत एकत्र असूनही दोन्ही पक्षांत कुरघोड्यांचे राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्यामुळे दोन्ही पक्षांत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. तुम्ही खूप सुंदर दिसता, असे नितीशकुमार यांनी भाजपच्या महिला आमदार निक्की हेमब्रम (Nikki Hembram) यांना तोंडावर सांगितल्याने नवीन राजकीय नाट्य सुरू झाले आहे. यावरुन राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कन्येने नितीशकुमारांवर निशाणा साधला आहे.

मागील काही काळापासून भाजपचे नेते नितीशकुमार यांना सातत्याने लक्ष्य करीत आहेत. याला जेडीयूचे नेतेही उत्तर देऊ लागल्याने सत्ताधारी आघाडीत जुंपल्याचे चित्र अनेक वेळा दिसू लागले आहेत. यातच आता नितीशकुमार यांनी भाजपच्या महिला आमदाराबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. याची तक्रार त्या महिला आमदाराने थेट पक्ष नेतृत्वाकडे केली आहे. यावर लालूंची कन्या रोहिणी आचार्य यांनी नितीशकुमारांवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या की, रंगीन मिजाजी के चर्चे सरेआम हैं इस उम्र में भी चच्चा बदनाम है. विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षाचा प्रमुख महिलांची सुंदरता पाहण्यात व्यग्र असल्यामुळे बिहारचे स्थान विकासाच्या बाबतीत तळाला गेले आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या आमदारांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत भाजपच्या महिला आमदार निक्की हेमब्रम यांच्याबाबत नितीशकुमार टिप्पणी केली. दारूबंदी आणि मोहाची दारू व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींना उपजिविकेचा दुसरा मार्ग उपलब्ध करून द्यावा, असे त्या बैठकीत सांगत होत्या. त्यावर तुम्ही खूप सुंदर दिसता, असे नितीशकुमार म्हणाले. राज्य सरकार याबाबत आधीच उपाययोजना करीत असून, तुम्हाला त्या माहिती नाहीत, असा टोलाही नितीशकुमारांनी लगावला.

यामुळे आमदार निक्की हेमब्रम या संतप्त झाल्या आहेत. त्यांनी या घटनेची तक्रार भाजपच्या नेतृत्वाकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी असभ्य वर्तन केल्याचा दावा त्यांनी केला आहे. विधानसभेतही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, नितीशकुमार यांच्या वर्तनामुळे मी अतिशय दु:खी झाले आहे. ते बोलले ते आक्षेपार्ह आणि अयोग्य होते. मी याबाबत पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली आहे.

कमी जागा येऊनही मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल 75 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. दुसऱ्या क्रमांकावर 74 जागांसह भाजप होता. जेडीयूला 43 जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसला 19 जागा मिळाल्या होत्या. नितीश यांच्या जेडीयूला कमी जागा मिळाल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर भाजपने नितीशकुमार यांचेच नाव पुढे केले होते. आता मात्र, भाजप आणि जेडीयूमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT