last five days 1701 covid positive patients found in kumbh mela
last five days 1701 covid positive patients found in kumbh mela 
देश

जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव बनतोय कोरोना उद्रेकाचे केंद्र

वृत्तसंस्था

हरिद्वार : जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असणाऱ्या कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोना महामारीतही खबरदारी न घेता लाखो भाविक स्नानासाठी गंगा नदीच्या किनारी एकत्र आल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मागील पाच दिवसांत 1 हजार 700 भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. देशातील कोरोना संसर्ग आणखी वाढवण्यास कुंभमेळा कारणीभूत ठरण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.  

कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिल या कालावधीत 2 लाख 36 हजार 751 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील 1 हजार 701 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात येत असून, यात अनेक आखाड्यांच्या महंतांसह भाविक पॉझिटिव्ह सापडले आहेत, आणखी काही चाचण्यांचे अहवाल हाती आलेले नसून, हा आकडा 2 हजारावर जाईल, अशी माहिती हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी शंभूकुमार झा यांनी दिली. 

हरिद्वार, टिहरी आणि डेहराडून जिल्ह्यांत 670 हेक्टर जागेवर कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक आखाडे हे कोरोना चाचणी करुन घेण्यास नकार देत आहेत. यामुळे कोरोनाचा उद्रेक आणखी मोठा असण्याची शक्यता व्यक्त आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येत कुंभमेळ्यामुळे प्रचंड मोठी वाढ होईल, असा इशारा तज्ञ देत आहेत. 

कुंभ मेळ्यात आतापर्यंत दोन शाही स्नान झाले आहेत. यातील पहिले 12 एप्रिलला आणि दुसरे 14 एप्रिलला झाले. ही पर्वणी साधण्यासाठी साधू-महंत, विविध आखाड्यांसह सुमारे 48.51लाख भाविक गंगा नदीवर आले होते. यातील बहुतांश हे मास्कविना होते. प्रचंड गर्दीमुळे सुरक्षित अंतर कुठेही दिसत नव्हते.शाही स्नानाची पुढील पर्वणी २७ एप्रिलला आहे. 

कोरोनाची दुसरी लाट देशात आली आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही हरिद्वार येथील कुंभमेळ्यातील गर्दी कमी झालेली नाही. उत्तराखंडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले होते. हरिद्वारमध्ये पाच दिवसांत 1 हजार 701 जणांना संसर्ग झाल्याने नियोजित वेळेआधी कुंभमेळ्याची सांगता करण्यासाठी प्रशासन आखाड्यांशी चर्चा करीत असल्याचे वृत्त होते. परंतु, प्रशासनाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. 

हरिद्वार येथील कुंभमेळा येत्या ३० पर्यंत सुरूच राहणार असल्याचा खुलासा सरकारने केला आहे. हरिद्वार येथे गेल्या कोरोना रुग्णसंख्या वाढत असूनही नियम न पाळता साधू-संत, महंतांसह भाविकांनी गंगा नदीत स्नान केले होते. उत्तराखंडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कुंभमेळ्याची सांगता नियोजित वेळेआधी करावी, अशी चर्चा उत्तराखंड सरकारकडून धार्मिक नेते व मोठ्या आखाड्यांशी करीत होते. मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सरकारे स्पष्ट केले आहे. 

कुंभमेळ्याचे आयोजन जानेवारी महिन्यात केले जाते, परंतु कोरोनाची परिस्थती लक्षात घेऊन राज्य सरकारने यंदा एप्रिलमध्ये कुंभमेळ्याचे नियोजन केले. संसर्गामुळे कुंभमेळ्याचा कालावधी कमी करण्याचे निर्देश केंद्र सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीत होते. त्याप्रमाणे कालावधी कमी करण्याबद्दल काही माहिती नाही, असे सांगत हरिद्वारचे जिल्हाधिकारी दीपक रावत यांनी यावर अधिक बोलणे टाळले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT