Anura Kumara Dissanayake  Sarkarnama
देश

Anura Kumara Dissanayake : शेतमजुराचा मुलगा बनणार राष्ट्रपती; श्रीलंका वाढवणार भारताची डोकेदुखी?

Rajanand More

New Delhi : मागील काही वर्षांपासून आर्थिक आणि राजकीय संकटात सापडलेल्या श्रीलंकेला नवी राष्ट्रपती मिळणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अनुरा कुमारा दिसानायके यांनी बाजी मारली आहे. ते एका शेतमजुराचे पुत्र असून केवळ दुसऱ्यांदाच बड्या घराण्यातील व्यक्ती राष्ट्रपती नसल्याने देशात इतिहास घडणार आहे.

अनुरा कुमारा हे डाव्या विचारसरणीचे नेते मानले जातात. मार्क्सवाद आणि लेनिनवादाचा त्यांच्यावर प्रभाव आहे. तर त्यांच्याआधी राष्ट्रपती असलेले गोटाबाया राजपक्षे हे उजव्या विचारसरणीचे नेते होते. पण 2021 मध्ये त्यांच्याविरोधात देशात मोठे आंदोलन पेटले आणि ते देश सोडून पळून गेले. त्यानंतर आता देशात उजव्या विचारसरणीवरून थेट डाव्या विचारसरणीचे राष्ट्रपती देश चालवणार आहेत.

अनुरा कुमारा दिसानायके हे नॅशनल पीपल्स पॉवर या पक्षाचे नेते आहेत. दहाव्या राष्ट्रपती निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी विरोधी नेत्यांना धुळ चारली आहे. राजपक्षे यांच्यानंतर राष्ट्रपती बनलेले रानिल विक्रमसिंघे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

अनुरा यांचे वडील श्रीलंकेतील अनुराधापुरात शेतमजूर म्हणून काम करायचे. त्यामुळे देशात केवळ दुसऱ्यांदाच एका सर्वसामान्य कुटुंबातील नेता राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहे. याआधी 1988 मध्ये रनसिंघे प्रेमदासा हेही सर्वसामान्य कुटुंबातील नेते राष्ट्रपती बनले होते.

चीनचे समर्थक

कुमारा हे चीनचे समर्थक मानले जातात. त्यामुळे भारतासाठी ही डोकेदुखी ठरू शकते. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी अदानी ग्रुपचा एक वीज प्रकल्प रद्द करण्याची घोषणाही केली होती. तसेच श्रीलंकेतील संकटादरम्यान भारताकडून होत असलेल्या मध्यस्थीवरही त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यांचा पक्ष चीनच्या हस्तक्षेपाचे समर्थन करतो.

दिसनायके यांच्या पक्षाचे संसदेत केवळ तीन खासदार आहेत. ते स्वत: 2000 साली पहिल्यांदाच खासदार झाले. चंद्रिका भंडारनायके कुमारतुंगा यांच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीही होते. काही काळाने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ते संसदेत विरोधकांचे चीफ व्हीप होते. मागील 24 वर्षांच्या संसदीय कारकार्दीमध्ये त्यांनी केवळ दोनच पदे भूषवली आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT