PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama
देश

देश वसाहतवादाच्या आणखी एका प्रतीकातून बाहेर; राजपथ बनला 'कर्तव्यपथ'

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : इंडिया गेट ते राष्ट्पती भवनापर्यंतच्या ‘राज'पथाच्या नावापासून दिसणाऱ्या गुलामीच्या खुणा मिटवून ‘कर्तव्यपथा‘वर अग्रेसर असलेल्या भारताचा ‘श्रमेव जयते‘हा नवा मंत्र आहे. आजच्या भारताचे आदर्श, संकल्प, लक्ष्य, रस्ते, प्रतीके हे सारे अस्सल भारतीय आहे. कर्तव्यपथाची ही प्रेरणा देशवासीयांत जो कर्तव्यपालनाचा प्रवाह निर्माण केरल तोच देशवासीयांत नवीन उर्जा जागवेल व हा कर्तव्यपथ श्रमातून यश ही जाणीव देशवासीयांत जागवेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. स्वातंत्र्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मार्गावर देशाने वाटचाल केली असती तर आजचे चित्र वेगळे दिसले असते पण दुर्देवाने त्यांना विस्मृतीत टाकले गेले असाही हल्लाबोल त्यांनी केला.

राजपथाचे कर्तव्यपथ असे नामकरण व इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, विविध देशांतील राजदूत, नेताजींचे कुटुंबीय व आझाद हिंद सेनेतील सैनिक यांच्यासह दिल्लीकर या भव्य सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधानंनी कर्तव्यपथाच्या नामफलकाचे उद्घाटन करताच सेंट्रल व्हिस्टा ॲव्हेन्यूचा हा परिसर रोषणाईने झगमगून गेला. नेताजी अमर रहे, या घोषणेने पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.

पंतप्रधान म्हणाले की ब्रीटीश राज्याचे व भारतीयांच्या गुलामीचे प्रतीक असलेल्या राजपताचे अस्तित्व मिटविण्याबरोबरच या रस्त्याची रचना व त्याचा आत्माही बदलला आहे. देशातील पायाभूत सुविधा म्हणजे फक्त रस्ते व उड्डाणपूल या भावनेतून भारत स्वातंत्र्याच्या अमृतकाळात बाहेर पडत आहे. सामाजिक, सांस्कृतिक, वाहतूकविषयक, डिजीटल या क्षेत्रांच्या पायाभूत सुविधांच्या वृध्दीसाठीही भारत सातत्याने कार्यरत आहे. देशाची मोठमोठी स्वप्ने साकारण्याची ताकद फक्त श्रमीक व गरीब वर्गात असते. या कर्तव्यपथाची निर्मिती करणाऱया कामगारांना आगामी २६ जानेवारीच्या संचलनासाठी विशेष पाहुणे म्हणून आपण आमंत्रित करणार आहोत असेही मोदी यांनी सांगितले.

मोदी म्हणाले

- स्वातंत्र्यानंतर नेताजींना दुर्लक्षित केले गेले, त्यांना विस्मृतीत ढकलण्याचा प्रयत्न झाला. पण हा देशाचा महानायक होता व त्यांचा तसाच सन्मानही होणे गरजेचे आहे ही आमच्या सरकारची भावना आहे.

- नेताजी भारताला आधुनिकही बनवू इच्छित होते.

- ज्याचे नावच राजपथ, तो रस्ता गुलामीच्या बेड्यांतून भारतीयांची मुक्तता कसा करू शकणार होता ?

- आमच्या सरकारने गेल्या ८ वर्षांत गुलामीची अशी अनेक प्रतीके इतिहासजमा केली. या काळआतील आमच्या सरकारच्या अनेक निर्णयांवर नेताजींची छाप आहे.

- राजपथाचे अस्तित्व संपून तो कर्तव्यपथ होणे ही गुलामी मानसिकतेच्या त्यागाची सुरवात व शेवट दोन्ही नाहीत. आपल्याला पुढे बरेच मार्गक्रमण करायचे आहे.

- नौदलानेही आपल्या झेंड्यावरील गुलामीचे प्रतीक हटवून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा असलेला ध्वज नुकताच धारण केला.

- कर्तव्यपताच्या रूपाने गुलामीची आणखी एक खूण नष्ट झाली.

- नेताजींचा इंडिया गेटवरील विशाल पुतळा त्यांच्या व्यक्तित्वातील साहस, स्वाभीमान, नेतृत्वक्षमता, व्हीजन यांची प्रेरणा देशवासीयांत जागवेल.

पुण्याच्या कलाकारांचे सुरेल सादरीकरण

या एतिहासिक सोहळ्यात एका देशभक्तीपर शास्त्रीय बंदिशीचेही सूरही होते. पं. सुहास व्यास व पुण्यातील १८ कलाकारांनी विख्यात बंदीशकार पं. श्रीकृष्ण रातंजनकर उर्फ सुजान यंंच्या लेखणीतून सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी उतरलेली ‘गाऊ जस गान मंगल गाऊ, आनंद सो स्वातंत्र्य देवी, जय जय जय शब्ज जगाऊ, वंदे मातरम' ही बंदीश सादर केली. आशिष केसकर यांनी संगीत संयोजन केले. मालकंस रागात बांधलेली ही बंदीश मध्य लय त्रितालात निबध्द आहे. तीन अंतरे असलेल्या या बंदिशीत पं. रातंजनकर यांनी भारतमातेच्या सौंदर्यस्थळांचे व जगात कोठेही नसतील असा वैशिष्ट्यांचे काव्यमय वर्णन केले आहे. पं. व्यास यांनी अनेकदा ती गायिली आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या वतीने (आयसीसीआर) ब्रिक्स संमेलनावेळी चीनमध्ये पं. व्यास यांचे गायन नुकतेच झाले होते. त्या प्रवासात त्यांनी आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांना ही बंदीश गाऊन दाखविली तेव्हा त्यांना ती फार आवडली. त्यांनी इंदिरा गांधी कलाकेंद्राचे प्रमुख सच्चिदानंद जोशी यचा व पं. व्यास यांचा संपर्क साधून दिला. आठ दिवसांपूर्वी जोशी यांनी पं. व्यास यांच्याशी संपर्क साधला व राजपथ नामकरण व सेंट्रल व्हिस्टा ॲव्हेन्यू उद्घाटन सोहळ्यात पं. रातंजनकरांची ही बंदीश आपण कलकारांसह सादर करावी अशी इच्छा व्यक्त केली. आजच्या सोहळ्यात हे एकमेव सांगीतिक सादरीकरण होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT