Mamata Banerjee, Adhir Ranjan Chowdhury Sarkarnama
देश

Adhir Ranjan Chowdhury : अधीरबाबूंना ममतांचा विरोध भोवला; पराभवानंतर दिल्लीत 'बेघर'

Rajanand More

New Delhi : काँग्रेसने देशात 99 हून अधिक खासदार निवडून आणत मागील दहा वर्षांतील रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. पण त्यांचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पश्चिम बंगालमधील संपूर्ण धुरा चौधरी यांच्याच खांद्यावर होती. निवडणुकीत त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कडाडून विरोध केला होता.

बहरामपूर लोकसभा मतदारसंघात टीएमसीचे उमेदवार व माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांनी चौधरींचा तब्बल 85 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. या पराभवानंतर चौधरींनी गुरूवारी मीडियाशी बोलताना आपण आता दिल्लीत बेघर होणार असल्याचे सांगितले. अधीर रंजन यांनी 1999 पासून या मतदारसंघात सलग पाच निवडणुका जिंकल्या होत्या.

अधीर रंजन यांनी ममतांसोबत आघाडी करण्यास जोरदार विरोध केला होता. ममतांनी इंडिया आघाडीसोबत चर्चा सुरू ठेवली होती. पण चौधरींकडून सातत्याने टीका केली जात असल्याने त्यांनी थेट एकला चलोची एकतर्फी भूमिका जाहीर केली. काँग्रेस पक्षश्रेष्ठींना अधीरबाबूंही ही भूमिका पटली नव्हती. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात ना मल्लिकार्जून खर्गे गेले, ना राहुल गांधी. याबाबत त्यांनी थेट भाष्य करण्यास नकार दिला.

ममतांनी अधीरबाबूंच्या पराभवासाठी गुजरातमधून युसूफ पठाण यांना आणले. त्यांच्या प्रचारतही ममतांही कुठलीही कसर सोडली नाही. अखेर ममतांचा विरोध अधीरबाबूंना भोवला आणि त्यांचा दारुण पराभव झाला. दरम्यान, चौधरी हे सध्या खासदार असल्याने त्यांना दिल्लीत बंगला मिळाला होता. आता पराभवामुळे हा बंगला सोडावा लागणार असल्याचे सांगत ते म्हणाले, पुढील काळ माझ्यासाठी खूप कठीण असणार आहे. बंगालमध्ये सरकारविरोधात लढताना मी उत्पन्नाच्या स्त्रोतांकडे दुर्लक्ष केले. मी स्वत: दारिद्रयरेषेखालील खासदार समजतो.

राजकारणाशिवाय आपल्याकडे दुसरे कुठलेही कौशल्य नसल्याचे मान्य करत चौधरी म्हणाले, पुढील काळात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल, त्याला कसे सामोरे जाणार, माहिती नाही. मी लवकरच दिल्लीतील शासकीय बंगला सोडेन. माझी मुलगी कधीकधी अभ्यासासाठी त्याचा वापर करते. तिथे दुसरे घर नसल्याने मला आता नवे घर शोधावे लागेल.

मी निवडणुकीतील पराभव मान्य केला आहे. मी आधीपासूनच प्रदेशाध्यक्ष पद सोडू इच्छित होतो. माझ्यापेक्षा जास्त लायक व्यक्तीला शोधण्याचा आग्रह मी पक्षश्रेष्ठींना केला होता. मी सोनिया गांधींच्या आग्रहाखातर थांबलो होतो. मला आतापर्यंत पक्षाच्या कोणत्याही नेत्याला फोन आलेले नाही. फोन आल्यावर मी पुन्हा पक्षाला माझी भूमिका सांगेन, असे अधीर रंजन यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT