Parliament political news : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून लोकसभेत दररोज सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना पाहायला मिळत होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू दिले जात नसल्याचा दावा करत काँग्रेसचे नेते आक्रमक झाले होते. तसेच एपस्टीन फाईल्सवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केले जात होते.
लोकसभेतील प्रचंड गदारोळादरम्यान अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसचे सात आणि डाव्या पक्षांच्या एका खासदाराचे निलंबन केले. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांवरील दरी आणखी वाढली. त्यानंतर विरोधकांनी बिर्ला यांच्याविरोधात थेट अविश्वास ठराव दाखल केला. त्यावरील चर्चेनंतर आवाजी मतदानाने हा ठराव नामंजूर झाला.
प्रस्ताव नामंजूर झाल्यानंतर बिर्ला यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह सर्वच सदस्यांचे कान टोचले होते. त्यानंतर सोमवारपासून संसदेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मनोमिलन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याबाबत बिर्ला यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक घेत यावर तोडगा काढल्याचे समोर आले.
मंगळवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर बिर्ला यांनी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांना खासदारांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. त्यांनी बैठकीत झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला. त्यावर खासदार के. सुरेश आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बैठकीचा उल्लेख करत दोन्ही बाजूच्या सदस्यांनी कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी, सभागृहाची प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.
किरेन रिजिजू यांनीही सरकारकडून विरोधकांना आश्वासित करण्यात आले. बिर्ला यांनी सभागृहाचे नियम आणि परंपरांचे पालन करण्याबाबत सर्व सदस्यांना सांगितले. त्यानंतरच रिजिजू यांनी निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव सादर केला. आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे त्याक्षणापासून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांना लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्यास परवानगी मिळाली.
निलंबित सदस्यांमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे, मनिक्कम टागोर, अमरिंदर सिंह राजा वडिंग, गुरजीत सिंह औजला, हिबी ईडन, डीन कुरियाकोस, किरण कुमार रेड्डी आणि डाव्या पक्षांचे के. एस. वेंकटेशन यांचा समावेश होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.