CSDS Apology: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील मतदारांची संख्या आणि सहा महिन्यांनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदारांची संख्या याच्या फरकाबाबत लोकनीती सीएसडीएस या मतदानाचं विश्लेषण करणाऱ्या संस्थेनं अखेर माघार घेतली आहे. आपली डेटा विश्लेषणात घोडचूक झाली असल्याचं या कंपनीचे सह-संचालक संजय कुमार यांनी मान्य केलं आहे. ट्विट करत त्यांनी याबाबत माफी देखील मागितली आहे.
लोकनीती-सीएसडीएस प्रकल्पाचे सह-संचालक कुमार यांनी २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील चार मतदारसंघांमधील मतदारांच्या संख्येत मोठा बदल दर्शविणारे आकडे पोस्ट केले होते, त्यापैकी दोन मतदारसंघांमध्ये मोठी घट दिसून आली तर दोन मतदारसंघांमध्ये अचानक वाढ दिसून आली होती. त्यांचे हे ट्विट वेगानं व्हायरल झाले होते. अनेक युजर्सनं यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या. मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात मतदारांची नाव वगळण्यात आली आहेत किंवा अस्पष्टपणे जोडण्यात आले असं या डेटामधून सूचित केलं गेलं आहे. काँग्रेसनंही संजय कुमार यांचं ट्विट शेअर करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला होता.
पण आता संजय कुमार यांनी माघार घेतल्यानंतर भाजप आक्रमक झाली असून संजय कुमार यांच्या माफीनाम्याचा दाखला देत काँग्रेसला फेकन्यूज पसरवल्याबद्दल जबाबदार धरलं आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी संजय कुमार यांचं माफी मागितल्याचं ट्विटचा स्क्रीनशॉर्ट आणि काँग्रेस नेते पवन खेरा यांचं एक ट्विट शेअर केलं आहे. त्यांनी दावा केला की, "महाराष्ट्र निवडणूक विषयीचा आपला डेटा बनावट असल्याचं सीएसडीएसचे संजय कुमार यांनी मान्य केलं आहे. या बनावट डेटाच्या आधारे काँग्रेसनं निवडणूक आयोगावर हल्ला केला. महाराष्ट्र आणि त्याच्या महान लोकांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेस माफी मागेल का? काँग्रेस ही बनावट बातम्यांची फॅक्टरी आहे. त्यांनी आजवर राफेलबद्दल खोटे बोलले, सावरकरांबद्दल खोटे बोलले, भारतीय लष्कराबद्दल खोटे बोलले, एलआयसीबद्दल खोटे बोलले आणि एसबीआयबद्दलही खोटे बोलले असं ट्विट त्यांनी केलं आहे"
संजय कुमार यांनी 'महाराष्ट्र निवडणुकीची काही माहिती' या शीर्षकाखाली दोन स्वतंत्र ट्विट शेअर केले होते. यामध्ये एकत्रितपणे, त्यांनी चार मतदारसंघांमधील डेटा मांडला होता. त्यांनी दावा केला की, रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदारांची संख्या ४.६६ लाखांवरून विधानसभा निवडणुकीत २.८६ लाखांवर आली. म्हणजेच ३८.४५ टक्क्यांनी घट झाली. देवळालीमध्येही असाच प्रकार दिसून आला, मतदारांची संख्या ४.५६ लाखांवरून २.८८ लाखांवर आली आहे, म्हणजेच ३६.८२ टक्क्यांनी घट झाली आहे. याउलट, नाशिक पश्चिममध्ये ४७.३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मतदारांची संख्या लोकसभा निवडणुकीत ३.२८ लाखांवरून वाढून विधानसभा निवडणुकीत ४.८३ लाख झाली. हिंगणघाटमध्येही असामान्य वाढ दिसून आली, ती ३.१४ लाखांवरून ४.५० लाखांवर पोहोचली, म्हणजेच ४३.०८ टक्क्यांनी यात वाढ झाली.
पण नंतर काही वेळात, संजय कुमार यांनी आपले हे दोन्ही ट्विट्स डिलीट केले आणि एक निवेदन प्रसिद्ध केलं. यात त्यांनी म्हटलं की, "महाराष्ट्र निवडणुकीबाबत पोस्ट केलेल्या ट्विट्सबद्दल मी मनापासून माफी मागतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा डेटा तुलना करताना त्रुटी आढळूल आली. आमच्या डेटा टीमने सलग डेटा चुकीचा वाचला. त्यानंतर ट्विट काढून टाकण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती पसरवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.