bjp flag sarkarnama
देश

Datia Assembly bypoll : धक्कादायक पराभवानंतर भाजपकडून मोठी कारवाई; जिल्हा कार्यकारिणी केली बरखास्त

Datia BJP, Hemant Khandelwal, MP BJP, BJP district unit : दतियातील पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपची अभूतपूर्व कारवाई; संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त, नरोत्तम मिश्रा यांचे वर्चस्व डळमळीत.

Rajanand More

BJP Politics : मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघात मोठा विजय मिळेल, अशी अपेक्षा भाजपच्या नेत्यांना होती. मात्र, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या मतदारसंघात तळ ठोकूनही पराभवाचा सामना करावा लागल्याने पक्षाने हा निकाल गांभीर्याने घेत मोठी कारवाई केली आहे.

दतिया विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार आषुतोष तिवारी यांचा ६ हजार १६ मतांनी पराभव केला. २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीतही भाजपचे नेते नरोत्तम मिश्रा यांचा पराभव झाला होता. यावेळी त्यांच्याऐवजी पक्षाने तिवारी यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे मतदारसंघात सुरूवातीपासूनच पक्षात मोठा असंतोष असल्याचे चित्र होते.

निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी पक्षाने समिती नेमली होती. या समितीने जिल्हा कार्यकारिणीतील अनेक पदाधिकाऱ्यांवर ठपका ठेवल्याचे सांगितले जाते. तिवारी यांनी समितीसमोर याबाबतचे पुरावे दिल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर पक्षाने संपूर्ण दतिया जिल्ह्याची कार्य़कारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने मागील काही वर्षांत पहिल्यांदाच अशी मोठी कारवाई केली आहे.

भाजपची ही कारवाई नरोत्तम मिश्रा यांना झटका असल्याचे मानले जात आहे. मिश्रा हे या मतदारसंघाचे तीनवेळा आमदार होते. दतिया जिल्हा कार्यकारिणीवर त्यांचे वर्चस्व होते. निवडणुकीदरम्यान त्यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांनी सहकार्य केले नाही, असा आरोप होत आहे. घनश्याम सिंह यांनीही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मदत केल्याचा दावा केला होता. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनीच घात केल्याची चर्चा रंगली होती.

बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही भाजपचा पराभव झाला आहे. हा मतदारसंघ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा बालेकिल्ला होता. मात्र, जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपला धक्का दिला. मात्र, एकीकडे दतियामध्ये जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली असताना बांकीपूरमध्ये मात्र अशी कोणताही कारवाई न झाल्याने तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT