प्रहार पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 56 इंचापेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची छाती मोठी असल्याचा टोला लगावला आहे. ते म्हणाले, बरं झालं मी निवडणुकीत पडलो, किमान आता वेळ तरी मिळत आहे. बच्चू कडूची ताकद बच्चू कडूमध्ये लपली आहे, आमदारकीमध्ये नाही. आता अजित पवार, पंकजा मुंडे, संजय राठोड यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत, असा इशाराही कडू यांनी दिला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे रात्री १० वाजता पाकिस्तानला संबोधित करणार आहेत. शाहबाज शरीफ यांचं आजच्या दिवसातील हे दुसरं संबोधन असणार आहे. बुधवारी (ता.7 मे) दुपारी त्यांनी पाकिस्तानच्या संसदेतून पाकिस्तानला संबोधित केलं होतं.
मनसेचे नेते अमित ठाकरे 'ऑपरेशन सिंदूर'बाबत भाष्य केलं. ते म्हणाले, भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जेवढं दुःख मला झालं होतं, तेवढं समाधान आज मला मिळत नाही. कारण ते अतिरेकी अजूनही फिरत आहे. पहलगाम हल्ल्यातील अतिरेकी अजूनही मोकाट फिरत आहे. म्हणून मला तो आनंद मिळालेलं नाही. न्याय तेव्हा मिळेल जेव्हा ते अतिरेकी हे मारले जातील, असं यावेळी अमित ठाकरे म्हणाले.
भारताच्या एअरस्ट्राईकला रशियाचा पाठिंबा दर्शवला आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जाकारोवा यांनी आम्हाला भारत-पाकिस्तान तणावाची चिंता असल्याचं म्हटलं आहे. यावेळी रशियाकडून दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं देखील आवाहनही करण्यात आलेलं आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री (7 मे), मॉक ड्रिलचा भाग म्हणून दिल्लीत 15 मिनिटांसाठी ब्लॅकआउट असेल. या संदर्भात, नवी दिल्ली महानगरपालिका परिषदेने (एनडीएमसी) निर्णय घेतला आहे की मॉक ड्रिलचा एक भाग म्हणून, संपूर्ण दिल्लीचा वीजपुरवठा 15 मिनिटांसाठी खंडित केला जाईल. या सरावादरम्यान सहकार्य करण्याचे आवाहन एनडीएमसीने लोकांना केले आहे.
'ऑपरेशन सिंदूर'नंतर, एअर इंडिया एक्सप्रेस, स्टार एअरलाइन्स, फ्लाय बिग कंपनीने सुरक्षेच्या कारणास्तव बुधवारी हिंडन विमानतळावरून त्यांच्या सर्व उड्डाणे रद्द केली. मुंबई, बेंगळुरू, गोवा, कोलकाता, भुवनेश्वर, वाराणसी, जयपूर, नांदेड, चेन्नई, किशनगड, आदमपूर, लुधियाना, भटिंडा, किशनगड यासह एकूण 15 शहरांसाठी 30 उड्डाण सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील सध्या सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता इंडियन प्रीमियर लीगवर दिसून येतो. 6-7 मे रोजीच्या रात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर, पाकिस्तानच्या सीमेवरील भारतीय भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याअंतर्गत, आता आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना पुन्हा वेळापत्रकात बदल करण्याची तयारी सुरू आहे. दोन्ही संघांमधील हा सामना धर्मशाळा येथे होणार आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी व शनिशिंगणापूर इथं निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक निधीसह प्रस्ताव प्राधान्याने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने जिल्हा कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.आशिया बोलत होते.
राज्याच्या पर्यटन संचालनालयाने पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व व्यवसायांच्या नोंदणीसाठी https://mahabooking.com/ हे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची नि:शुल्क नोंदणी करता येणार असल्याची माहिती पर्यटन संचालनालय नाशिक विभागाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई यांनी दिली.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत त्याचा बदला घेतला. काल रात्री भारताने पाकिस्तानच्या सीमेत घुसून 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. युद्धाची परिस्थिती पाहून केंद्रीय गृहमंत्र्यांनी आता उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. येथे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही त्यांचा गुजरात दौरा रद्द केला आहे आणि ते राजस्थानला आले आहेत, जिथे त्यांनी गृहमंत्र्यांसोबत ऑनलाइन उच्चस्तरीय बैठकीत भाग घेतला.
राज ठाकरे काय म्हणतायत याला महत्त्व नाही. संपूर्ण भारत जनता पाठीशी उभी आहे आणि झालेल्या कारवाईचे कौतुक करत आहेत. संपूर्ण जग देखील आपल्या पाठीशी उभे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांना शोधून काढण्यात केंद्र सरकारला अद्याप यश आलेले नाही. दहशतवाद्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही लक्षात राहील, असा धडा शिकवणे गरजेचे होते. अशावेळी पाकिस्तानशी युद्ध करणे किंवा मॉकड्रील आणि एअरस्ट्राईक या गोष्टी फायद्याच्या नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले होते.
भारताच्या कारवाईचे इस्त्रायलने उघड समर्थन केलं आहे. भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी म्हटलंय की, आम्ही भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन करतो. दहशतवाद्यांना त्यांच्या गुन्ह्यांची किंमत चुकवावी लागेल. इस्त्रायलने या आधीही भारताला पाठिंबा दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव ही एक गंभीर परिस्थिती आहे. आम्हाला आशा आहे की लवकरच शांतता प्रस्थापित होईल. तर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, अमेरिका या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि दोन्ही देशांशी संपर्कात आहे.
भारतीय सैन्याने पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये 26 मायभगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करुन सैन्याने बदला घेतल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पाकिस्तानचे भारतातील 'स्लीपर्स सेल' उद्ध्वस्त करुन दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे. भारतीय सैन्य सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम असल्याचे 'ऑपरेशन सिंदूर'ने ते दाखवून दिले. भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे, विवेकाचा आवाज ऐकण्याचे आणि राजनैतिक मार्गाने समस्या सोडविण्याचे आवाहन करतो .प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी हे आवश्यक आहे. दोन्ही देशांना संयम आणि राजनैतिक तोडगा काढण्यासाठी तातडीने संवाद साधण्याची आवश्यकता असल्याचे कतार ने सिंदूर आॅपरेशन वर प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे . दोन्ही देशांना यात कोणतीही मदत लागली तर ती करण्यासाठी कतार पूर्ण सहकार्य करेल, असा शब्दही कतार परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात चर्चा झाली. यावेळी पाकिस्तानकडून अतिरेक झाला तर उत्तर देण्याची आमची तयारी आहे, असं अजित डोवाल यांनी सांगितलं. परिस्थिती चिघळावी अशी भारताची इच्छा नाही, पण जर पाकिस्तानने तणाव वाढवला तर आमची निर्णायक उत्तर देण्याची तयारी आहे, असं अजित डोवाल म्हणाले.
भारतीय लष्कराने दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राइकचं सर्वसामान्यांकडू स्वागत होत असताना, त्यावर प्रतिक्रिया देखील उमटत आहे. लष्करी सेवेतून निवृत्ती झालेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भारताने केलेल्या एअर स्ट्राइकवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे म्हणाले, "भारतीय लष्कारने पाकिस्तानातील (Pakistan) नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचं देशभरात कौतुक होत आहे. लष्कराच्या शौर्याचं हे कौतुक शब्दात पकडता येणार नाही, असं आहे. इतकं सुंदर काम लष्करानं केले आहे. लष्काराच्या कारवाईचं अभिनंदन".
पाकिस्तानकडून भारताला प्रत्युत्तर देण्याची तयारी करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीची बैठक पार पडली. यानंतर लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत.
भारताने पाकिस्तानमधील 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केल्यानंतर भारताचे माजी लष्करप्रमुख मनोज मुकंद नरावणे यांनी ट्विट करत पिक्चर अभी बाकी है. असे म्हणत खळबळ उडवून दिली आहे. अजूनही काही मोठे घडणार आहे का? असा सवाल विचारला जात आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर उद्या दिल्लीत बैठक होत आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांना या ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत माहिती दिली आहे. राष्ट्रपतींनी भारतीय सैन्याचे कौतुक केलं आहे,
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मसूद अझहर याने निवेदन प्रसिद्ध केले आहे. भारताच्या बहावलपूरवरील हवाई हल्ल्यात त्याच्या 10 कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या माध्यमांनी अहवाल दिला आहे की त्याच्या घरात 14 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आज दुपारी 4 वाजता बहावलपूर, पाकिस्तान याठिकाणी अंत्यविधी होणार आहे, असे त्यांने सांगितले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे, भारताने आम्हाला डिवचलं नाहीतर आम्ही तणाव संपविण्यास तयार आहोत, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले.अंतराळ मोहिमेबाबत त्यांनी माहिती दिली. चांद्रयान मोहिमेच्या माध्यमातून अंतराळातील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. इस्त्रोने एका मिशनमध्ये एकावेळी १०० सॅटेलाईट सोडले. प्रत्येक भारतीयाच्या उपयोगासाठी आमचे सॅटेलाईट काम करणार असे मोदी म्हणाले.
पहलगाममधील हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली असून दहशतवाद्यांची ओळख देखील पटली आहे. तपासात या हल्ल्याचा पाकिस्तानशी थेट संबंध असल्याचं उघडकीस आलं असून पाकिस्तानच दहशतवादाचा बालेकिल्ला असल्याचं वक्तव्य आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना विक्रम मिसरी यांनी केलं.
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान निष्पाप नागरिकांची काळजी घेण्यात आली; अशी माहिती भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती दिली.
पहलगाम येथील दहशवादी हल्ला जम्मू काश्मीरच्या विकासाला धक्का बसावा यासाठीच केल्याचं भारतीय लष्कराने स्पष्ट केलं आहे. तपासात पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध आले उघडकीस. पाकिस्तानातून भारतात आणखी हल्ला होऊ शकतात, अशी गुप्त माहिती समोर आल्याचंही लष्कराने पत्रकार परिषदेत सांगितलं.
भारतानं दहशतवादी हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी आणि संभाव्य दहशतवादाला थांबवण्यासाठी भारताने आपल्या अधिकारांचा वापर केला आहे. ही कारवाई नियोजित होती, असं लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेला सुरूवात झाली असून या पत्रकार परिषदेत हल्ला करणारा गट लष्कर ए तय्यबाशी संबंधित असून पहलगाम येथील तपासानुसार पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचं उघड झालं आहे. तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांची ओळख पटली असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.
ऑपरेशन सिंदूरऑपरेशन सिंदूरवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावर दोन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटवर जय हिंद! असे म्हणत ऑपरेशन सिंदूरचे पोस्टर शेअर केले आहे.
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आलेल्या एअर स्ट्राईक यशस्वी झाल्यानंतर आज सकाळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले.
भारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय सैन्यदलांचे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे. भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश एकजुटीने त्यांच्यामागे उभा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कारवाईचे समर्थन, कौतुक केले आहे.
भारती लष्कराने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकडे स्वागत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.
या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.
भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन!
जय हिंद!
पहलगाम हल्ल्यानंत भारताने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला. या कारवाईमध्ये 90 दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे, दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू-काश्मीरमधील सर्व विमानतळ बंद ठेवण्यात आली आहेत.
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ऑपरेशन सिंदूरवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानातील दहशतवादी तळावंर भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्याचं स्वागत करतो. पाकिस्तानला अशी अद्दल घडवली गेली पाहिजे की पुन्हा कधीही दुसरं पहलगाम होणार नाही. तेथील दहशतवादला पूर्णपणे नष्ट केलं गेलं पाहिजे. जय हिंद, अशा शब्दात त्यांनी हा कारवाईचं स्वागत केलं आहे.
भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदल्यासाठी केलेल्या कारवाईवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारताचे केलेली कारवाई 'इट इज शेम' अशी प्रतिक्रिया ट्रम्प त्यांनी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना भारताच्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आम्ही याबाबत ऐकलं आहे. इट इज शेम, अपेक्षा आहे की हे सर्व लवकरात लवकर संपेल. हे दोन देश अनेक शतकांपासून एकमेकांशी संघर्ष करत आहेत. मला आशा आहे की हे सगळं लवकर संपेल.
भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकिस्तानच्या हद्दीत घुसुन दहशतवादी अड्डे लष्कराने उध्वस्त केलेत. या मोहीमेला भारताने ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं आहे. मध्यरात्री भारताने पीओके मध्ये केलेल्या कारवाईनंतर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'भारत माता की जय' असं सूचक ट्विट करत विजय आपलाच होईल असे संकेत दिले आहेत.
अखेर भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकिस्तानच्या हद्दीत घुसुन दहशतवादी अड्डे लष्कराने उध्वस्त केले आहेत. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. याला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं आहे. एकूण नऊ ठिकाणी हा हल्ला करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.