Maharashtra Politics : सर्व आमदार माजलेत, असे लोक म्हणत असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभेत केले होते. हे विधान केवळ विधिमंडळातील आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीसाठी नव्हते तर मागील काही दिवसांपासून अन्य काही आमदार व मंत्र्यांची विधाने व कृत्यांमुळे निर्माण झालेल्या नाराजीतून होते. फडणवीसांचा संताप त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. आता त्याचे पडसादही महाराष्ट्राच्या राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीत असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतल्याचे समजते. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 25 मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. भाजपसह महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंत्र्यांची पदे जाणार असल्याची चर्चा आहे. वादग्रस्त विधाने आणि कृत्यांमुळे सरकारला तोंडघडी पाडणारे आठ मंत्री हिटलिस्टवर असल्याचे दिसते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही तसा दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, गृह राज्यमंत्री योगेश कदम आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, केवळ चारच नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळच साफ करून वेगळ्या चेहऱ्यांना आणण्याबाबत दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तूळात चर्चा सुरू असल्याचा दावाही राऊतांनी केला आहे.
केवळ शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्र्यांनाच आपले पद गमवावे लागेल, असे नाही तर भाजपमधील मंत्री टार्गेटवर असू शकतात. त्यामध्ये मत्स्यविकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे मंत्रिपदही धोक्यात येऊ शकते. राणे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त विधाने करण्यात आली आहेत.
शिवसेनेतील शिरसाट, कदम यांच्यासह शालेय शिक्षणमंत्री दादा भूसे आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनाही डच्चू दिला जाऊ शकतो. शिरसाट यांच्याभोवती मागील काही दिवसांत अनेक वाद निर्माण झाले आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या निधीवरूनही त्यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. भरत गोगावले यांच्या पूजेवरून वाद निर्माण झाला होता. तर कदम यांच्या आईच्या नावावर मुंबईत बारवरूनही विरोधक आक्रमक झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहेत. हिटलिस्टमध्ये त्यांचा क्रमांक पहिला असू शकतो. मंत्रिपदी वर्णी लागल्यापासून त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची कानउघाडणीही केली होती. आता तर ते विधिमंडळातच रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यावरून राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचेही मंत्रिपद जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तूळात आहे. काही मंत्र्यांना डच्चू देण्याऐवजी खाते बदलण्याचा पर्यायही फडणवीस सरकारसमोर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.