Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi 
देश

'ठाकरे सरकार केव्हाही पडू शकते'; सोनिया गांधींच्या सर्वात विश्वासू खासदाराचा दावा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारमधील मंत्री घोटाळ्याच्या आरोपांमुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. तर विरोधी पक्षाकडूनही महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे दावे केले जात आहेत. तारखा जाहीर केल्या जात आहे. मात्र हे सरकार पाच वर्षे टिकणारच, असा विश्वासही महाविकास आघाडी सरकारचे नेते करत आहेत. ('Mahavikas Aghadi government could collapse at any time'; Congress MP claims)

या सर्व घडामोडी पाहता, महाराष्ट्राचं सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं, असं विधान स्वत: काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत खासदार कुमार केतकर बोलत होते. "ज्या दिवशी हे सरकार स्थापन झाले आहे त्या दिवसापासूनच ही भीती आहे की महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकते. भाजप हा अत्यंत साधनशूचिता (उपलब्ध साहित्य साधनांचा योग्य वापर करण्याची कला) असणारा पक्ष आहे. कर्नाटक आणि मध्यप्रदेशात जे झालं हे पाहिलं की लक्षात येतं. ज्यावेळी तथाकथित ऑपरेशन लोटसमध्ये लोक स्वतःच राजीनामा देतात आणि निवडणुकीत बहुमत मिळालेल्या सरकारला जुमानत नाहीत आणि पुन्हा निवडून येतात. हे सर्व कसं रीतसर, घटनात्मक पद्धतीने होतं", असं कुमार केतकर यांनी सांगितलं.

"हे अत्यंत साधनशूचितेनं होतं. उमेदवारांना वाटलं म्हणून ते कर्नाटक सरकारमधून बाहेर पडले, त्यांना वाटलं म्हणून ते मध्यप्रदेश सरकारमधून बाहेर पडले. गोव्यातल्या लोकांनाही बाहेर पडावसं वाटलं आणि ते बाहेर पडले, कारण भाजप हा साने गुरुजींच्या विचारावर चालणारा पक्ष आहे, हे मला माहीत आहे", असं म्हणत कुमार केतकर यांनी टोलाही लगावला.

यादरम्यान कुमार केतकर यांनी महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईबाबतही भूमिका मांडली. "भाजप तपास यंत्रणांचा वापर करतो की नाही याबाबत वाद असू शकतो, पण ज्या दिवशी केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजप सामील झाले तेव्हापासून त्यांच्याबद्दलच्या भ्रष्टाचाराच्या चर्चाही पूर्णपणे थांबल्या आहेत. नारायण राणे भाजपमध्ये येण्याआधी भाजप नेते त्यांच्याविरोधातही भाषणे करत होते. ही सर्व भाषणं युट्युबवर आजही उपलब्ध आहेत. पण राणे भाजपमध्ये गेल्यापासून त्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा अचानक थांबली," याकडे केतकरांनी लक्ष वेधले.

विशेष म्हणजे याच कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर देखील उपस्थित होते. कुमार केतकर यांच्या विधानावर प्रकाश जावडेकर यांनाही, भाजप महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहे का, असा सवाल विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना जावडेकर म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीकडे फक्त कागदावर बहुमत आहे. त्यांच्यात जर काही असंतोष असेल तर त्यांच सरकार स्वतःहून कोसळेल. त्यांचं सरकार पाडण्यासाठी आम्ही काहीच केलं नाही.

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून लक्ष्य केलं जात आहे असा देखील आरोप आहे, त्यावर काय सांगाल असं विचारले असता जावडेकर म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पाठीमागे आहेत असा आरोप करणं चुकीचं आहे, त्या यंत्रणांना आम्ही सांगितलं नाही किंवा ते कुणाच्या ऐकण्यात नसतात. पण कर नाही त्याला डर कशाला असं म्हणतात. जर तुम्ही तुमच्या उत्पन्नांबद्दल पारदर्शक असाल, आयकर भरत असाल तर तुम्हाला कसलीही भीती असणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT