Villagers’ Attack on BJP MP Sparks Political Reactions : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भारतीय जनता पक्षामध्ये टोकाचे राजकीय शत्रुत्व आहे. कोणतीही हिंसक घटना घडू अथवा सरकारच्या निर्णयांवर भाजपकडून थेट ममतांवर हल्लाबोल चढवला जातो. त्यातच पुढीलवर्षी राज्यात विधानसभेच्या निवडणुका असल्याने दोन्ही बाजुंची आक्रमकता वाढली आहे. त्यातच सोमवारी भाजपच्या खासदारावर झालेल्या हल्ल्याने मोठे वादळ उठले आहे.
जलपाईगुडी जिल्ह्यात भाजपचे खासदार खगेन मुर्मू आणि आमदार शंकर घोष यांच्यावर स्थानिकांनी मंगळवारी हल्ला केला होता. त्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक झाली होती. यामध्ये मुर्मू यांच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर भाजपने ममता बॅनर्जी सरकारवर हल्ला चढवला होता. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच हा हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला होता.
राजकीय वादळ उठल्यानंतर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी मोठं पाऊल उचललं. त्यांनी मंगळवारी सायंकाळी थेट मुर्मू यांच्यावर उपचार सुरू असलेले रुग्णालय गाठले. मुर्मू यांच्यावर सिलीगुडीमधील रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. ममतांच्या या कृतीने सर्वांनाच धक्का बसला. यापूर्वीही भाजपच्या नेत्यांवर हल्ले झाले आहेत. पण त्यांनी अशाप्रकारे रुग्णालयात जाऊन विचारपूस केल्याची मागील काही वर्षांत पाहायला मिळाले नव्हते.
ममतांनी खासदार मुर्मू यांच्या पत्नी आणि मुलाशीही काही मिनिटे संवाद साधला. तसेच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही त्यांनी चर्चा केली. मुर्मूंशीही त्या बोलल्या. त्यांच्या उपचारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना ममतादीदींनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच आवश्यकता असल्यास आपल्याशी बोलण्याचेही त्यांनी सांगितले.
मुर्मू यांना भेटून रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी फार काही गंभीर नसल्याचे मीडियाशी बोलताना सांगितले. तृणमूल काँग्रेसने या भेटीचे फोटो सोशल मीडियात पोस्ट केले आहेत. दरम्यान, आमदार घोष यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली किंवा नाही, याबाबत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, एकीकडे भाजपकडून हल्ला चढवला जात असताना ममता बॅनर्जी यांनी आपल्या कृतीतून राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून त्यांनी आपल्याविषयी सहानुभूती निर्माण करण्यात एक पाऊल पुढे टाकले आहे. तर त्यांच्या पक्षाला दोषी ठरविण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपच्या मनसुब्यांवरही पाणी फिरवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममतांनी राजकीय शत्रुत्व बाजूला ठेवत परिस्थितीचे गांभीर्य दाखवून दिले आणि विरोधी पक्षांनी कोणत्याही मुद्द्यावर राजकारण करू नये, असा संदेश दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.