Narendra Modi and Amit Shah
Narendra Modi and Amit Shah Sarkarnama
देश

आमदारांना चहा पाजणं मुख्यमंत्र्यांना पडणार महागात; मोदी-शहांनी थेट दिल्लीत बोलावून घेतलं

सरकारनामा ब्युरो

इम्फाळ : मणिपूर विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) सत्ताधारी भाजपने 60 पैकी 32 जागा पुन्हा सत्ता मिळवली आहे. भाजपने स्वबळावर बहुमताच्या आकडा गाठला असला तरी आता मुख्यमंत्रिपदाचा पेच निर्माण झाला आहे. यातच मुख्यमंत्री बिरेनसिंह यांनी आमदारांना चहापानाला बोलावून शक्तिप्रदर्शन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल भाजप नेतृत्वाने घेतली असून, त्यांना तातडीने दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे. यामुळे सिंह यांना डच्चू मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बिरेनसिंह आणि थोंगाम विश्वजित यांच्यासह भाजपच्या (BJP) प्रदेशाध्यक्षा शारदा देवी या दिल्लीला रवाना झाल्या आहेत. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या सिंह आणि विश्वजित हे दोघेही त्यांच्या मतदारसंघात मोठ्या मतांनी विजयी झालेले आहेत. सिंह यांनी भाजपच्या विजयी आमदारांसाठी चहापानाचे आयोजन केले होते. भाजपच्या 32 आमदारांपैकी 25 आमदार या चहापानाला उपस्थित होते, असा दावा सिंह यांच्या गोटातून केला जात आहे. याचवेळी विरोधी गटाने भाजपचे केवळ एक तृतीयांश आमदार चहापानाला उपस्थित असल्याचा दावा केला आहे.

काल सायंकाळी झालेल्या चहापान कार्यक्रमामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे एकप्रकारे सिंह यांचे शक्तिप्रदर्शन असल्याचा संदेश विरोधकांनी पक्ष नेतृत्वाला पोचवला आहे. या चहापान कार्यक्रमामुळे भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शक्तिप्रदर्शनातून सिंह यांनी नेतृत्वाला संदेश दिल्याचे मानले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे भाजपमधील काही नेते खासगीत नाराजी व्यक्त करीत आहेत. याची गंभीर दखल आता पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. सिंह यांच्यासह मुख्यमंत्रिपदाचे दुसरे दावेदार विश्वजित यांना पक्ष नेतृत्वाने आजच्या आज दिल्लीत बोलावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

चहापानामुळे पक्ष नेतृत्व सिंह यांच्यावर नाराज असल्याचे समजते. याचा फटका त्यांना बसू शकतो, अशीही शक्यता व्यक्त आहे. भाजपने मणिपूरसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांना निरीक्षक नेमले आहे. पण मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटत नसल्याने अखेर केंद्रीय नेतृत्वानेच सूत्रे हाती घेतल्याचे दिसत आहे. मोदी, शहा आणि नड्डा हेच मणिपूरचा पुढचा मुख्यमंत्री ठरवतील, अशी चिन्हे आहेत. यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या दोन्ही दावेदारांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री एन.बिरेनसिंह (N.Biren Singh) यांनी राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. ते काळजीवाहू म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. बिरेनसिंह यांनी मणिपूरमध्ये (Manipur Election) पक्षाला पुन्हा सत्तेत आणल्याने त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावे, असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे. याचवेळी असे केल्यास पक्षाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांना डावलले जाईल, असे पक्षातीलच आणखी एक गट म्हणत आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षा शारदा देवी यांना मुख्यमंत्रिपदाचा वादावर काहीही स्पष्ट बोलणे टाळून संसदीय मंडळाकडे बोट दाखवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT