Meera kumar
Meera kumar  
देश

अनेकांनी माझ्या वडीलांना धर्म बदलण्याचा सल्ला दिला होता...

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : ''माझ्या वडीलांना जगजीवन राम यांना जातीमुळे भेदभावाचा सामना करावा लागला. माझ्या वडीलांना अनेकांनी हिंदू (Hindu) धर्म सोडण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांनी आपण आपला धर्म सोडणार नाही आणि जातिव्यवस्थेविरुद्ध (Caste system) लढणार असल्याचे ठामपणे सांगितले. "धर्म बदलल्याने जात बदलते का" असा सवाल माझे वडील नेहमी करायचे. अशी आठवण सांगत माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार (Meera Kumar) यांनी भारतातील जातिव्यवस्थेवर भाष्य केले आहे.

एकविसाव्या शतकातील भारतातही जातिव्यवस्था कायम आहे. आजही देशात दोन प्रकारचे हिंदू आहेत. एक जे मंदिरात जाऊ शकतात आणि दुसरे जे मंदिरात जाऊ शकत नाहीत. नवी दिल्लीतील राजेंद्र भवन येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आपली भारतीय संस्कृती विविधतापूर्ण आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. आपण सर्वांनी आपल्या जीवनात विविध धर्मांकडून सर्वोत्तम गोष्टी शिकल्या आहेत आणि हा आपला वारसा आहे, आपण सर्वांनी आधुनिकतेच्या मार्गावर चालले पाहिजे आणि जागतिक नागरिक बनले पाहिजे, अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. “पुजारी मला अनेकदा माझ्या गोत्राबद्दल विचारतात, त्यावेळी मी त्यांना नेहमी एकच उत्तर देते की, जिथे जातीपाती मानल्या जात नाहीत, अशा ठिकाणी माझे संगोपन झाले असल्याचे मीरा कुमार सांगतात.

राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांच्या नवीन पुस्तक 'द लाइट ऑफ एशिया: द पोएम दॅट डिफाइन्ड बुद्ध' या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. 'लाइट ऑफ एशिया' हे पुस्तक सर एडविन अरनॉल्ड यांनी लिहिले होते जे 1879 मध्ये प्रथम प्रकाशित झाले होते. या पुस्तकात बुद्धाचे जीवन एका कवितेच्या रूपात मांडण्यात आले आहे. त्यांचे पुस्तक त्या कवितांवर आधारित आहे. या पु्स्तकातून एक प्रकारे बुद्धाची 'मानवतेची बाजू' पाहणाऱ्या व्यक्तीचे चरित्रही आहे. "जोपर्यंत बिहारमधील बोधगया येथील महाबोधी मंदिराच्या व्यवस्थापनाचा प्रश्न आहे, माझे पुस्तक हिंदू-बौद्ध संघर्षावर तोडगा काढण्यावरही प्रकाश टाकते. हे पुस्तक लिहिण्याचे एक कारण म्हणजे मला अयोध्येच्या संदर्भात दोन धर्मांमधील संघर्षाचे निराकरण समजून घ्यायचे होते, असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

या पुस्तकाने समाजव्यवस्थेची "बंद दारे उघडण्यास" मदत होणार आहे. आतापर्यंत अनेक लोकांची जातिव्यवस्थेत घुसमट होत आहे. आज आपण 21 व्या शतकात राहतो. आपल्याकडे चकाकणारे रस्ते आहेत पण त्यावरून चालणारे अनेक लोक अजूनही जातिव्यवस्थेने त्रासलेले आहेत. आपण आपली जातीवर आधारित मानसिकता कधी सोडणार आहोत, असा सवाल करत मीरा कुमार यांनी, आजही आपल्या देशात दोन प्रकारचे हिंदू आहेत, एक जे मंदिरात जाऊ शकतात आणि दुसरे माझ्यासारखे जे जाऊ शकत नाहीत, याचा पुनरुच्चार केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT