Marathi Abhijat Bhasha Sarkarnama
देश

Marathi classical language : मायबोली मराठीला 'अभिजात' भाषेचा दर्जा! ; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी केंद्राचा मोठा निर्णय

Marathi Abhijat Bhasha : तमाम मराठी बांधवांसाठी आनंदाचा क्षण; अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

Mayur Ratnaparkhe

Center Govt decision on Marathi language : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने आज सर्वात मोठा निर्णय जाहीर केला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात होती.

आता केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे समस्त मराठी बांधवांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून अभिनंदन होते आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेसह पाली, बंगाली, आसामी, प्राकृत भाषेला अभिजात दर्जा बहाल केला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी ट्वीटद्वाराे खास प्रतिक्रिया दिली आहे. 'माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!! अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार!' असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनीही आनंद व्यक्त केला असून, 'आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो. हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ' अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT