Microsoft server outage today Sarkarnama
देश

Microsoft Server Down : मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर अचानक डाऊन! आउटलुक-365 वापरकर्त्यांचे हाल; लॉग-इन करताना उडाली तारांबळ

Microsoft server outage today : मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर अचानक डाऊन झाल्याने Outlook आणि Microsoft 365 वापरकर्त्यांना लॉग-इन करताना अडचणी आल्या. नेमकी काय समस्या निर्माण झाली? जाणून घ्या ताजे अपडेट्स.

Rashmi Mane

जगातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टच्या सेवांमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री उशिरापासून कंपनीची लोकप्रिय ई-मेल सेवा Outlook आणि Microsoft 365 चे सर्व्हर अचानक डाऊन झाले. यामुळे भारतासह जगभरातील अनेक वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. ई-मेल पाठवणे किंवा येणे बंद झाले तसेच अकाउंटमध्ये लॉग-इन करताना यूजर्सना समस्या येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

या सर्व्हर डाऊनचा परिणाम केवळ वैयक्तिक वापरकर्त्यांपुरता मर्यादित राहिला नाही, तर Microsoft 365 वर अवलंबून असलेल्या अनेक कंपन्या आणि कार्यालयांच्या कामकाजावरही त्याचा परिणाम झाल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचे ई-मेल पाठवता येत नसल्याने अनेकांच्या कामात अडथळे निर्माण झाले.

Downdetector वर तक्रारींचा पाऊस

ऑनलाइन सेवांमधील बिघाडाची माहिती देणाऱ्या Downdetector या प्लॅटफॉर्मवर Outlook संदर्भातील तक्रारींमध्ये अचानक मोठी वाढ झाली. अमेरिकेच्या ईस्टर्न टाइमनुसार दुपारी सुमारे 1 वाजल्यापासून या समस्येच्या तक्रारी नोंदवण्यास सुरुवात झाली. काही वेळातच तक्रारींचा आकडा वाढून Outlook संदर्भात 1 लाखांहून अधिक रिपोर्ट नोंदवण्यात आले. तर Microsoft 365 बाबतही 15 हजारांपेक्षा जास्त वापरकर्त्यांनी समस्या नोंदवल्या.

मायक्रोसॉफ्टने काय दिली माहिती?

या तांत्रिक बिघाडाची दखल घेत मायक्रोसॉफ्टने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून माहिती दिली. कंपनीच्या तांत्रिक टीमकडून समस्येचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला हा बिघाड अमेरिकेतील वापरकर्त्यांपुरता मर्यादित असल्याचे दिसत होते. मात्र, नंतर कंपनीने या समस्येचा परिणाम जगभरातील Microsoft 365 वापरकर्त्यांवर होण्याची शक्यता व्यक्त केली.

कंपनीने सांगितले की, 'आम्ही परिणाम कमी करण्यासाठी काम करत असताना, या समस्येमुळे कोणत्याही प्रदेशातील वापरकर्त्यांच्या Microsoft 365 सेवा कनेक्टिव्हिटीवर परिणाम होऊ शकतो, याची आम्ही पुष्टी केली आहे.'

आता Outlook आणि Microsoft 365 मधील तांत्रिक बिघाड पूर्णपणे कधी दूर होतो आणि सेवा पूर्ववत कधी सुरू होतात, याकडे जगभरातील वापरकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT