MLAs from Jharkhand sarkarnama
देश

पुन्हा एका राज्यात ऑपरेशन लोटस? आमदार बॅगा घेऊनच बैठकीला आले

राजकीय संकटाबाबत आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या निवासस्थानी महाआघाडीच्या आमदारांची बैठक झाली.

सरकारनामा ब्यूरो

रांची : राजकीय संकटाबाबत आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या निवासस्थानी महाआघाडीच्या आमदारांची बैठक झाली. त्याचवेळी बैठक संपल्यानंतर सत्ताधारी आघाडीच्या आमदारांना घेऊन जाणाऱ्या तीन बस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून अज्ञात स्थळी रवाना झाल्या. झारखंड (Jharkhand) मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) च्या आमदारांसह सुरक्षा कर्मचारीही बसमध्ये उपस्थित होते.

घोडेबाजाराच्या भीतीने आमदारांना सुरक्षित स्थळी पाठवले जात असल्याचे बोलले जात आहे. आमदारांना कुठे पाठवले जात आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. गरज पडल्यास सत्ताधारी आघाडीच्या आमदारांना पश्चिम बंगाल किंवा छत्तीसगडसारख्या विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्यामध्ये हलवण्याची तयारी करण्यात आल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले.

भाजपच्या (BJP) भीतीपोटी हे केले जात आहे, असा आरोप होत आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''आमच्या आघाडीच्या आमदारांना छत्तीसगड किंवा पश्चिम बंगालमध्ये पाठवण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही बिगर भाजप सरकार आहेत. आमदारांना रस्त्याने नेण्यासाठी तीन लक्झरी बस रांचीला पोहोचल्या आहेत.

रणनीती ठरविण्यासाठी सत्ताधारी आघाडीच्या आमदारांची तिसरी बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडली. सर्व सत्ताधारी आमदार आपापल्या सामानासह बैठकीला उपस्थित होते. याप्रकरणी भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे ट्विटही समोर आले आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, झारखंड मुक्ती मोर्चाच्या सूत्रांनुसार, काही आमदार पहाटे 2 वाजता छत्तीसगडमध्ये पोहोचले. बहुतेक आमदार जाण्यास कचरत आहेत. जेएमएमचे ज्येष्ठ नेते बसंत सोरेन यांच्या आदेशाची वाट पाहत आहेत. आमदारांसाठीच्या काही बसेस रांचीत उभ्या आहेत.

झारखंडचे राज्यपाल रमेश बैस शनिवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अपात्र ठरवल्याचा आदेश निवडणूक आयोगाकडे पाठवू शकतात. राजभवनच्या सूत्रांनी ही माहिती दिली. या अहवालांदरम्यान, सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) - काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आघाडी पुढील रणनीती बनवत आहे. 81 सदस्यीय विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे 49 आमदार आहेत. सर्वात मोठा पक्ष जेएमएमकडे 30 आमदार, काँग्रेसचे 18 आमदार आणि तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाकडे (आरजेडी) एक आमदार आहे. प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडे २६ आमदार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT