BJP Sarkarnama
देश

MLC Election 2026: भाजपला पुन्हा झटका! निकाल जाहीर होण्याआधीच केला जल्लोष आता उमेदवार पराभूत; बिहारच्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर

MLC Election 2026: महाराष्ट्रातील या निवडणुकीसोबतच उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटकातल्या विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपला पुन्हा एकदा झटका बसला आहे.

Amit Ujagare

MLC Election 2026: महाराष्ट्रातील पाचही शिक्षक-पदवीधर विधानपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला असून पाच पैकी केवळ २ जागांवरच विजय झाला. तर महाविकास आघाडीनं ३ जागा खिशात घातल्या. महाराष्ट्रातील या निवडणुकीसोबतच उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटकातल्या विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपला पुन्हा एकदा झटका बसला आहे.

बिहारमधील ८ जागांपैकी ३ जागाच भाजप्रणित एनडीएला जिंकता आल्या आहेत. तर विरोधीपक्षातील लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानं दोन जागांवर विजय मिळवला. यामध्ये पटना शिक्षक मतदारसंघाबरोबरच दरभंगा पदवीधर मतदारसंघातही राजदनं विजय मिळवला. दरभंगाच्या जागेवर आधीच भाजपकडून विजयाचा जल्लोष केला गेला होता, पण आज अंतिम निकाल घोषित झाल्यानंतर भाजपवर मोठी नामुष्की ओढवली कारण ती जागा राजदच्या उमेदवारानं जिंकली.

दरम्यान, पटाना शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा झटका बसला. कारण राजदचे डॉ. संजीव कुमार सिंह यांनी भाजपच्या नवलकिशोर यादव यांचा १०५७ मतांनी पराभव केला. नवल किशोर यादव या जागेवर पाच वेळा विधानपरिषदेवर निवडून जाऊन आमदार बनले होते. त्यामुळं त्यांच्या पराभवामुळं पटना शिक्षक मतदारसंघावर भाजपचं तीन दशकांचं वर्चस्व समाप्त झालं आहे. तर दुसरीकडं पटाना पदवीधर मतदारसंघात जेडीयूच्या नीरज कुमार यांनी चौथ्यांदा आपली जागा राखली. त्यांनी राजदच्या दिलीप पटेल यांचा पराभव केला. याच मतदारसंघात त्यांना आपल्या पक्षाचे आमदार अनंत सिंह यांच्या प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला होता. या ठिकाणी अनंत सिंह यांनी जनसुराज पार्टीचे उमेदवर डॉ. अनुज सिंह यांना पाठिंबा जाहीर केला होता.

त्यानंतर दरभंगा शिक्षक मतदारसंघात जनसुराज पार्टीचे डॉ. सुरेश प्रसाद राय यांनी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार डॉ. मदन मोहन झा यांना ३२४ मतांनी पराभूत केलं. त्यांच्यातील लढत खूपच घासून झाली. या विजयानंतर जनसुराज पार्टीनं बिहारमध्ये विधानपरिषदेत आपलं खात उघडलं आहे. त्याचबरोबर तिरहूत शिक्षक मतदारसंघात भाजपच्या नरेंद्र प्रसाद सिंह यांचा विजय झाला. त्यांनी अपक्ष उमेदवार भूषण कुमार झा यांना ५९४ मतांनी हरवलं. या जागेवर आधी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार संजय कुमार सिंह हे आमदार होते. तर तिरहूत पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार वंशीधर ब्रजवासी यांनी आपली जागा राखली. त्यांनी जेडीयूचे अभिषेक झा यांचा ९,१४७ मतांनी पराभव केला.

कोसी पदवीधरमध्ये भाजपचे डॉ. एन. के. यादव यांनी विजयाची हॅट्रिक केली. त्यांनी राजदचे नीतेश यादव यांचा १०,०२६ मतांनी पराभव केला. आठ जागांपैकी या जागेवर सर्वात मोठ्या विजयाचं अंतर राहिलं आहे. तसंच सारण शिक्षक मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार डॉ. राहुल राज यांचा विजय झाला. त्यांनी जेडीयूच्या आनंद पुष्कर यांचा १८१५ मतांनी पराभव केला.

वाराणसीच्या दोन्ही जागा सपाच्या खात्यात

दरम्यान, उत्तर प्रदेशातील सर्व ११ जागांवरील निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपचे ६ जागा जिंकल्या तर ५ जागा समाजवादी पार्टीच्या खात्यात जाण्याची चिन्हं आहेत. यांपैकी ३ जागांवरील निकाल जाहीर झाले आहेत, तर दोन जागांवरचे निकाल अद्याप जाहीर होणार आहेत. यामध्ये भाजपनं आग्रा पदवीधर, बरेली-मोरादाबाद शिक्षक, लखनऊ शिक्षक, मेरठ शिक्षक आणि पदवीधर तसंच गोरखपूर-फैजाबाद शिक्षक या जागा जिंकल्या आहेत. तर सपानं अलहाबाद-झांशी पदवीधर आणि वाराणसी आणि आग्रा-अलिगढ शिक्षक या जागांवर विजय मिळवला आहे. त्याचबरोबर लखनऊ पदवीधरची जागाही सपानं जिंकल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. वाराणसी शिक्षक मतदारसंघात सपाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT