PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama
देश

PM Narendra Modi : शपथ घेऊन 24 तास उलटत नाही तोच मोदींचा शेतकऱ्यांनंतर आता सर्वसामान्यांसाठीही 'हा' धडाकेबाज निर्णय

Jagdish Patil

PM Modi Govt Portfolio Announcement : नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. 9 जून) रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर काही तासांतच त्यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला. पदाचा कार्यभार स्वीकारताच मोदींनी किसान योजनेच्या 17 व्या हफ्त्याच्या फाईलवर सही केली. यामुळे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी जमा होणार आहेत.

सोमवारी सकाळी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतल्यानंतर सायंकाळी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत मोदींनी (PM Narendra Modi) सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधानांनी सर्वसामान्यांची पक्क्या घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी देशभरात 3 कोटी घरे बांधण्यासाठी निधी देण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यामुळे आता मोदींनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारताच मोठमोठ्या निर्णयांची अंमलबजावणी करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.

ही तीन कोटी घरे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून बांधण्यात येणार आहेत. हा निर्णय जाहीर करताना मोदी म्हणाले, आमच्या नवीन सरकारचा पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीची आमची कटिबद्धता दर्शवतो. तर दुसर्‍या निर्णयातून गरिबांच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं जाणार आहे.

केंद्रात भाजपप्रणीत (BJP) एनडीएचं सरकार स्थापन करताच पंतप्रधान मोदी यांनी सर्वात पहिला शेतकऱ्यांसाठी आणि त्यानंतर आता सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेतला. मोदींच्या पहिल्या निर्णयामुळे देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तर दुसऱ्या निर्णयामुळे 12 ते 15 कोटी लोकांना हक्काचं घर मिळणार आहे.

शिवराज सिंह चौहान देशाचे नवे कृषीमंत्री

दरम्यान, आजच्या मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि नवनिर्वाचित खासदार शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्याकडे देशाच्या कृषीमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता इथून पुढे देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची जबाबदारी चौहान यांच्या खांद्यावर असणार आहे.

शिवराज सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रस्ते विकास आणि परिवहन खाते देण्यात आले आहे. अमित शाह यांना गृहमंत्रीपद तर राजनाथ सिंह यांना संरक्षण, एस जयशंकर यांना परराष्ट्र मंत्रीपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT