Amit Shah and Vivek Agnihotri News, vivek Agnihotri News, The Kashmir Files Movie News
Amit Shah and Vivek Agnihotri News, vivek Agnihotri News, The Kashmir Files Movie News Sarkarnama
देश

'काश्मीर फाईल्स'चा असाही फायदा! दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीला मोदी सरकारकडून 'वाय' सुरक्षा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटावरुन सध्या मोठा गदारोळ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण मंत्रिमंडळ आणि भाजपचे नेते या चित्रपटाचा प्रचार करताना दिसत आहे. काश्मिरी पंडितांवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आहेत. या चित्रपटाचा पहिला फायदा त्यांना झाला असून, मोदी सरकारने त्यांना 'वाय' दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. (Vivek Agnihotri News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाचे आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचे जाहीर कौतुक केले होते. काश्मीर पंडितांवरील अत्याचार दाखवणारा हा चित्रपट पाहून प्रेक्षकांचे डोळे पाणावतात, असे मोदी म्हणाले होते. याचबरोबर मोदींनी अग्निहोत्री हे निडर असल्याची प्रशंसाही केली होती. आता मोदी सरकारने अग्निहोत्री यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. ही सुरक्षा त्यांना संपूर्ण भारतभरासाठी लागू असेल.

महाराष्ट्र विधानसभेतही गदारोळ

दरम्यान, या चित्रपटावरून महाराष्ट्राच्या विधानसभेतही (Assembly session) गोंधळ झाला होता. भाजप (BJP) आमदारांनी हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य करत हा चित्रपट केंद्र सरकारने करमुक्त केला, तर तो निर्णय संपूर्ण देशात लागू होईल, असे सांगितले होते. पवार म्हणाले होते की, मिशन मंगल, तानाजी, पानिपत हे चित्रपट करमुक्त केल्याची आठवण करून देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 'काश्मीर फाईल' सिनेमाचा उल्लेख केला आहे. केंद्राने हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला तर संपूर्ण देशालाच तो लागू होईल. अगदी जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत करमुक्त होईल

या वेळी भाजपच्या सदस्यांनी आक्षेप घेतला होता. अजित पवार यांचे बोलणे झाल्याशिवाय बोलायला दिले जाणार नाही अशी, भूमिका तालिका अध्यक्षांनी घेतल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यावेळी सत्ताधारी सदस्यांनी 'पळाले रे पळाले' म्हणत 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' ... 'जय भवानी जय शिवाजी' अशा जोरदार घोषणा दिल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT