Narendra Modi, Arvind Kejriwal
Narendra Modi, Arvind Kejriwal sarkarnama
देश

मोदीजी, हे ‘रेवड्या‘ वाटण्याचे नव्हे, पुण्याचे काम... केजरीवाल यांचा पलटवार

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : नागरिकांना विविध सेवा मोफत देण्याच्या योजनेवरील टीकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली व पंजाबातील सत्तारूढ आम आदमी पक्षावर निशाणा साधल्यावर 'आप'चे सर्वेसर्वा व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लोकांसाठी मोफत देण्याच्या योजना म्हणजे ‘रेवड्या‘ वाटण्याचे नव्हे तर पुण्याचे, विकसित, गौरवशाली भारताची पायाभरणी करण्याचे काम आहे, अशा शब्दांत केजरीवाल यांनी पलटवार केला आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोदी यांच्या उमेदवारास नव्हे तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याची घोषणा केजरीवाल यांनी करणे व त्याच वेळी मोदींनी उत्तर प्रदेशात, विविध वस्तू मोफत देण्याच्या योजनेवर सडकून टीका करणे यामागील योगायोग स्पष्ट असल्याचे जाणकार मानतात.

दिल्लीत शिक्षण, उपचार महिलांना बसप्रवास, ठराविक किलोवॉटपर्यंत वीज, पाणी हेमोफत देण्याची केजरीवाल यांनी राबविलेली घोषणा ‘क्लिक' झाली व केजरीवाल यांना २०१५ नंतर सलग दोनदा दिल्लीकरांनी बंपर मतांनी निवडून दिले. हीच योजना काहीसे स्वरूप बदलून केजरीवाल यांनी पंजाबात नेली व तिकडेही आपला भरघोस विजय मिळाला.

जेथे कॉंग्रेस पुरती निस्तेज होते तेथे ‘आप'ला आणखी यश मिळते असेही निरीक्षण मांडले जाते. दिल्लीत या मोफत योजनेच्या विरोधात मोदी-अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपने सातत्याने रान उठविले तरी दिल्लीकरांनी निवडणुकीच्या फडात भाजपला हिंग लावून विचारले नसल्याची वस्तुस्थिती आहे. भाजपला या ‘केजरीवाल फॉम्यूल्या‘ची कायम धास्ती वाटत राहिली आहे.

मात्र, आता यावर खुद्द पंतप्रधानांनी टीकास्त्र सोडणे याला वेगळे अर्थ आणि वेगळ्या छटाही आहेत. उत्तराखंड, छत्तीसगड व गुजरातसह आगामी काळात निवडणुका होणाऱ्या अनेक राज्यांत 'आप'चा वाढता जोर दिसल्यानेच पंतप्रधान 'आप'च्या मोफत योजनांच्या या प्रभावी ‘अस्त्रा‘च्या विरोधात बोलताना मोदींनी मोफत देणे म्हणजे मोफत रेवड्या वाटणे आहे.

रेवड्या वाटणे म्हणजे जनतेला खरेदी करणे होय. अशा रेवडी संस्कृतीच्या विरोधात युवकांनी या घातक रेवडी संस्कृतीपासून सावध रहावे, असेही पंतप्रधान म्हणाले. केजरीवाल यांनी मोदींना काही वेळातच प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, दिल्लीत १८ लाख गरीब मुलांना मोफत शिक्षण देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, लाखो लोकांना मोफत उपचारांकरवी त्यांचे प्राण वाचविणे हे रेवड्या वाटणे नव्हे. हे घातक काम नसून देशहिताचे व देशाची पायाभरणी करण्याचे पुण्यकर्म आहे. हे काम ७५ वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते.

रेवडी संस्कृती म्हणून याला हिणविणे योग्य नाही. मागच्या काही वर्षांत दिल्लीत तब्बल किमान ४ लाख पालकांनी आपल्या मुलांना खासगी शाळांतून काढून सरकारी शाळांत पाठवले आहे. दिल्लीतील सरकारी शाळांचा दर्जा सुधारला, गरीबमुलांचे भवितव्य सावरले हा काय माझा गुन्हा झाला काय ? असाही सवाल केजरीवाल यांनी मोदी यांना विचारला.

रेवड्या वाटणे म्हणजे काय....

फुकट रेवड्या वाटणे म्हणजे काय हे मी सांगतो, असे सांगताना केजरीवाल म्हणाले की, एका कंपनीने अनेक बॅंकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेतले व सारा पैसा खाऊन तो पळून गेला. बॅंक दिवाळखोरीत गेली. त्याच कंपनीने एका राजकीय पक्षाला हजारो कोटींच्या देणग्या दिल्या व या कंपनीच्या बुडवाबुडवीवर सरकारने काहीही कारवाई केली नाही. यालाच मोफत रेवड्या वाटणे म्हणतात. जनतेवर कराचा एक पैसाही न वाढविता आम्ही जनतेला सुविधा दिल्या आहेत असेही केजरीवाल यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT