लग्न म्हटलं की घरात आनंदाचं वातावरण आणि पाहुण्यांची लगबग असते. मात्र बिहारमधील मोकामा येथे एका लग्नाची चर्चा सध्या देशभरात रंगली आहे. कारण हे लग्न कोणत्याही सामान्य कुटुंबातील नसून बिहारचे आमदार अनंत सिंह यांच्या मुलगी शिवांगी सिंह हिचे आहे. या शाही विवाहसोहळ्यासाठी करण्यात आलेल्या भव्य तयारीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शिवांगी सिंह हिचा विवाह आज 25 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला तब्बल 4 ते 5 लाख पाहुणे उपस्थित होते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या पाहुण्यांच्या जेवणासाठी 150 हून अधिक प्रकारचे पदार्थ तयार केले जात आहेत. यासाठी 500 पेक्षा जास्त आचाऱ्यांची टीम कामाला लागली आहे. मुख्य जेवणापासून विविध मिठाईंपर्यंतच्या पदार्थांची तयारी करण्यासाठी स्वतंत्र स्वयंपाकघर उभारण्यात आले आहेत.
या विवाहसोहळ्यासाठी मोकामातील नदवां गावात 10 ते 12 एक्कर जागेवर भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. लग्नाचा मंडप जयपूरमधील राजवाड्यांच्या धर्तीवर सजवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, लग्नाच्या तयारीवर स्वतः अनंत सिंह लक्ष ठेवून आहेत. कार्यक्रमासाठी निश्चित केलेले घोडदौड मैदान तयार करण्याची जबाबदारीही त्यांनी स्वतः घेतली आहे.
अलीकडे झालेल्या पावसामुळे मैदानात पाणी आणि चिखल साचला होता. त्यामुळे सक्शन मशीन, जेसीबी, ट्रॅक्टर आणि रोड रोलरच्या मदतीने मैदान सपाट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शेकडो समर्थक आणि स्थानिक नागरिकही या तयारीत सहभागी झाले आहेत.
या लग्नाची आणखी एक चर्चा म्हणजे वधू-वरांना दिल्या जाणाऱ्या महागड्या भेटवस्तू. जावयाला जवळपास 3 कोटी रुपये किमतीची लँड रोव्हर डिफेंडर गाडी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तसेच घोडदौड स्पर्धेतील विजेत्याला महिंद्रा थार देण्याचीही चर्चा रंगली आहे.
अनंत सिंह हे बिहारमधील मोकामा मतदारसंघातील जनता दल (यूनाइटेड) या पक्षाचे आमदार आहेत. चर्चित राजकीय नेते असून, त्यांना स्थानिक पातळीवर 'छोटे सरकार' म्हणूनही ओळखले जाते. त्यांची राजकीय कारकीर्द, समर्थकांमधील प्रभाव आणि वेगळी कार्यशैली यामुळे ते अनेकदा चर्चेत राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्याकडेही देशभरातील लोकांचे लक्ष वेधले गेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.