Mamata Banerjee  Sarkarnama
देश

मुंबई दौऱ्यामुळं अडचणीत आलेल्या ममता बॅनर्जींना न्यायालयाचा मोठा दिलासा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यामुळे अडचणीत आल्या होत्या.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या मुंबई दौऱ्यामुळे अडचणीत आल्या होत्या. त्यांनी राष्ट्रगीत अर्धवट म्हटल्याचा मुद्दा भाजपने उपस्थित केला होता. या प्रकरणी भाजप (BJP) नेत्यांनी ममतांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारही केली होती. या प्रकरणी न्यायालयाने ममतांना मोठा दिलासा दिला आहे.

ममता बॅनर्जी यांनी 1 डिसेंबरला मुंबईत माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी उठून स्वत: राष्ट्रगीत म्हटले होते. हे राष्ट्रगीत अर्धवट म्हटल्याचा मुद्दा भाजपने उपस्थित केला होता. ममतांच्या दौऱ्यावरून आधीच टीका करीत असलेल्या भाजपला ही आयती संधी मिळाल्याचे मानले जात होती. राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी ममतांच्या विरोधात भाजप नेत्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रारही दाखल केली होती. या प्रकरणी शिवडी न्यायालयाने ममतांच्या विरोधात समन्स बजावले होते. त्यांना 2 मार्चला न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. या समन्सला आज न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 25 मार्चला होणार आहे.

मुंबई भाजपचे सरचिटणीस विवेकानंद गुप्ता यांनी ही तक्रार दाखल केली होती. ममता बॅनर्जी यांनी जाणूनबुजून राष्ट्रगीताचा अपमान केला. राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे. ममता बॅनर्जी यादेखील त्याच राज्यातील आहेत. ममतांनी केवळ राज्यातील नागरिकांचाच नव्हे, तर संपूर्ण देशाचा अपमान केला आहे. त्यामुळे मी मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती करतो की, त्यांच्याविरोधात तात्काळ एफआयआर नोंदवून त्याची चौकशी करावी, असे गुप्ता यांनी तक्रारीत म्हटले होते.

ममता बॅनर्जी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाच्‍या दृष्‍टीने ममतांनी पवारांची भेट घेणे महत्‍वाची मानले जात होते. या भेटीनंतर ममतांनी काँग्रेस वगळून तिसऱ्या आघाडीचे सूतोवाच केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ममतांची त्यांच्याशी भेट होऊ शकली नव्हती. पण पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी त्यांची भेट झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT