Nitesh Rane| Narayan Rane | Disha Salian Case News Updates Sarkarnama
देश

अडचणीत येताच नारायणे राणेंनी मुलाला सोबत घेऊन थेट पोलीस ठाणं गाठलं..

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सॅलियन (Disha Salian) हिच्या मृत्यूवरून राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या प्रकरणी केलेल्या विधानावरून ते अडचणीत आले आहेत. यानंतर आज राणेंना पुत्र नितेश यांनी सोबत घेऊन थेट मालवणी पोलीस ठाणे गाठले. (Disha Salian case news updates)

दिशा सॅलियन हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे आणि नितेश राणे यांनी केला आहे. या प्रकरणी राणे पिता-पुत्रांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुन्हा एकदा हा मुद्दा उकरून काढल्यामुळे राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी नारायण राणे यांना 4 मार्च, नितेश राणेंना 3 मार्चला चैाकशीसाठी हजर राहण्यासाठी मालवणी पोलिसांनी नोटीस बजावली होती. यामुळे राणे पिता-पुत्र आज जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर झाले.

खेळ तुम्ही सुरु केला..संपविणार आम्ही..न्याय मिळणार #JusticeForDishaSalian, असे टि्वट काही वेळापूर्वी नितेश राणेंनी केले आहे. मालवणी पोलीस ठाण्याने बजावलेल्या समन्सवर बोलताना नितेश राणे यांनी थेट न्यायालयासमोर पुरावे सादर करण्याची भूमिका घेतली होती. ते म्हणाले होते की, आम्हाला पोलिसांच्या नोटिसा आज मिळाल्या आहेत. आम्ही त्याला योग्य उत्तर देणार आहोत. दिशा सॅलियनच्या मृत्यूबाबत आम्ही अनेक पुरावे न्यायालयात सादर करणार आहेत. दिशाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.

शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याची बदनामी करण्याची तक्रार केली होती. यानंतर मालवणी पोलीस ठाण्यातून महिला आयोगाने दिशा सॅलियन प्रकरणाचा अहवाल मागवला होता. त्यात दिशा सॅलियनच्या शवविच्छेदनाचा अहवालाचा समावेश आहे. दिशा सॅलियनवर बलात्कार झाल्याचा शवविच्छेद अहवालामध्ये उल्लेख नाही. यानंतर नारायण राणे यांच्यावर महिला आयोगाने खोटे आरोप केल्याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर नारायण राणे अडचणीत आले होते. तर नितेश राणे हे देखील संतोष परब हल्ल्यानंतर अडचणीत आले होते. आता तर दिशा प्रकरणामुळे राणे पिता-पुत्र अडचणीत आलेत. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी राणेंनी थेट राज्यातील एका युवा मंत्र्यावर अप्रत्यक्ष आरोप केले आहेत. त्यामुळे आता दिशाबाबत केलेले वक्तव्य राणेंना भोवणार का? आणि त्यांना अटक होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT