Boris Johnson Sarkarnama
देश

लॉकडाऊनमधील पार्टी अंगलट : ब्रिटनच्या पंतप्रधानांवर राजीनामा देण्यासाठी दबाव

Boris Johnson may resign :

सरकारनामा ब्युरो

मेक्सिको सिटी : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांवर बंधने असचाना ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) यांनी केलेली दारू पार्टी त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहे. या पार्टीमुळे त्यांच्यावर काल ब्रिटनच्या (United Kingdom) संसदेत माफी मागण्याची वेळ आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठीही दबाव वाढत आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावरील हा त्यांच्या दबाव स्वपक्षातून देखील आहे.

ब्रिटीश माध्यमांच्या वृत्तानुसार जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषि सुनक (Rishi Sunak) पुढचे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. ते इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murti) यांचे जावई देखील आहेत. सुनक यांच्याव्यतिरिक्त परराष्ट्र मंत्री लिज ट्रूस, मंत्री मायकल गोव, माजी परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट, गृह मंत्री प्रिती पटेल, आरोग्य मंत्री साजिद जाविद आणि कॅबिनेट मंत्री ओलीवर डॉउडेन यांची नावं देखील आघाडीवर आहेत.

जगभरात कोरोना (Corona) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराचा संसर्ग वाढत आहे. ब्रिटनमध्ये (UK) यामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांवर बंधने असतानाच पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी मित्रांना बोलावून दारू पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. पंतप्रधान जॉन्सन यांच्या खासगी सचिवाने पाठवलेला ई-मेलमधून हा प्रकार समोर आला होता.

जॉन्सन यांच्या सुमारे १०० मित्र आणि सहकाऱ्यांना हा ई-मेल पाठवण्यात आला होता. या ई-मेलमध्ये तुमची दारू तुम्हीच आणा, असे म्हटले होते. जॉन्सन आणि त्यांची प्रेयसी केरी यांनी ही पार्टी दिली होती. आमंत्रणानंतर तब्बल ४० जण या पार्टीला उपस्थित होते. पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थान असलेल्या डाऊनिंग स्ट्रीटवरील गार्डनमध्ये २०२० च्या नाताळमध्ये झाली होती. त्यावेळी ब्रिटनमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे डाऊनिंग स्ट्रीटवर सातत्याने होणाऱ्या पार्ट्या चर्चेत आल्या होत्या.

लॉकडाऊन दरम्यान देशातील शाळा, पब आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आली असताना, सामान्य नागरिक त्रासात असताना पंतप्रधान जॉन्सन यांचे पार्टी प्रकरण समोर आल्यानंतर मोठा गदारोळ उडाला होता. त्यांनी केलेल्या पार्टीचा व्हिडीओही समोर आला होता. यात ते मित्र व सहकाऱ्यांसमवेत हास्यविनोदात रमले असल्याचे दिसत होते. त्यानंतर पंतप्रधान अशा प्रकारे पार्टी कसे करू शकतात, असे प्रश्न विचारत देशभरातील नागरिकांनी जॉन्सन यांना लक्ष्य केले होते.

देशभरातील माध्यम आणि नागरिकांकडून होणाऱ्या टीकेनंतर अखेर जॉन्सन यांनी काल ब्रिटनच्या संसदेत देशाची माफीनामा सादर करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. "मला सगळ्यांची माफी मागायची आहे. काही गोष्ट चुकीच्या पद्धतीने झाल्या. मी याची जबाबदारी घेतो." असे त्यांनी म्हटले होते. मजूर पक्षाचे नेते केर स्टार्मर यांनी यावरून जॉन्सन यांच्यावर हल्लाबोल केला होता. देशाचे नेतृत्व करण्याची नैतिकता जॉन्सन यांनी गमावली आहे, असे त्यांनी म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT