Amarinder Singh, Navjot Kaur and Navjot Singh Sidhu 
देश

पंजाबमधील वाद टोकाला! कॅप्टन विरुद्ध आता सिद्धूंची पत्नी मैदानात

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नीने अमरिंदरसिंगांना खुले आव्हान दिले आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. या वादात आता सिद्धूंच्या पत्नी नवज्योतकौर (Navjot Kaur Sidhu) उडी घेतली आहे. त्यांनी अमरिंदरसिंगांना खुले आव्हान दिल्याने खळबळ उडाली आहे.

कॅप्टन आणि सिद्धू यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. या वादात आता सिद्धूंच्या पत्नी नवज्योतकौर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी कॅप्टन यांना खुले आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हिंमत असेल तर कॅप्टन यांनी अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढावी. त्यांना सिद्धू आणि त्यांची लोकप्रियता कळेल. एवढेच नव्हे तर कॅप्टन यांच्या टीमची खाण्यापासून राहण्यापर्यंतची सोय आम्ही करू.

कॅप्टन यांनी सिद्धू हे देशद्रोही असल्याचा आरोप केला होता. याचा समाचार घेताना नवज्योतकौर यांनी कॅप्टन यांच्या पाकिस्तानी महिला पत्रकार अरूसा आलम यांच्यासोबत असलेल्या मैत्रीवरही प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, सिद्धू हे देशद्रोही असते तर ते देशासाठी कधीच खेळले नसते. ते क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानला गेले होते आणि योगायोगाने कर्तारपूर कॉरिडॉर बनला. सिद्घूंना मिळालेला सन्मान कॅप्टनला पहावला नाही. पाकिस्तानी नागरिकांशी संबंध ठेवण्यापेक्षा एखाद्या पाकिस्तानी नागरिकाला घरात ठेवणे अधिक धोकादायक आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून कॅप्टन अमरिंदरसिंग यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन एकाच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली होती. यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढवले होते. या निर्णयाचे स्वागत करण्यात कॅप्टन अमरिंदरसिंग आघाडीवर होते. पंजाबमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारी अथवा मार्चमध्ये विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. यातच अमित शहांनी ही खेळी खेळून निवडणुकीआधीच निम्मा पंजाब केंद्र सरकारच्या ताब्यात घेतला आहे.

राज्यात या निर्णयावरून वातावरण तापले आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी कॅप्टन यांची भेट घेतली होती. यानंतर कॅप्टन आता पुन्हा दिल्लीत अमित शहांची भेट घेत आहेत. कॅप्टन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरची त्यांची ही तिसरी भेट आहे. यात बैठकीत कॅप्टन हे नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ते भाजपसोबत हातमिळवणी करुन जागा वाटपाबाबत चर्चा करतील, असेही बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT