Tajinder Bagga arrest case
Tajinder Bagga arrest case Sarkarnama
देश

भाजप नेत्याला न्यायलयाचा दिलासा मिळताच केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाने उचलले मोठे पाऊल

सरकारनामा ब्युरो

Tajinder Bagga arrest case:

मोहाली : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा (Tajinder Pal Singh Bagga) यांच्या अटकेवरुन शनिवार-रविवारी रात्री पुन्हा एकदा मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. या सर्व घडामोडींनंतर रविवारी मध्यरात्री बग्गा यांना पंजाब - हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab An Hariyana High court) अटकेपासून दिलासा दिला असून १० मे पर्यंत त्यांना अटक न करण्याचे आणि कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने पंजाब पोलिसांना दिले आहेत.

मोहाली सत्र न्यायालयाने शनिवारी संध्याकाळी बग्गा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. या अटक वॉरंटला त्यांनी तातडीने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर शनिवारी रात्री उशिरा उच्च न्यायालयाचे न्यायामुर्ती अनुप चितकारा यांनी त्यांच्या घरी सुनावणीला परवानगी दिली. त्यानंतर रविवारी मध्यरात्री ४५ मिनीटं सुनावणी पार पडली आणि न्यायालयाने बग्गा यांना १० मे पर्यंत अटकेपासून दिलासा दिला. १० मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

दरम्यान बग्गा यांना न्यायालयाचा दिलासा मिळताच केंद्रीय अल्पसंख्यांक आयोग मैदानात उतरला असून आयोग पंजाब पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता आहे. ANI वृत्तसंस्थेशी बोलताना आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा म्हणाले, तेजिंदर पाल सिंग बग्गा यांना अटक करताना पंजाब पोलिसांनी त्यांना पगडी देखील घालू दिली नाही, असा आरोप होत आहे. अनेक माध्यमांमधून याबाबतचे वृत्त प्रकाशित झाले आहे. हे एका शीख व्यक्तीच्या धार्मिक अधिकाराचे हे उल्लंघन आहे. यावर आम्ही पंजाब सरकारला ७ दिवसांच्या आत अहवाल सोपविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

यापूर्वी आम आदमी पक्षाचे नेते डॉ. सनी सिंह यांनी १ एप्रिल रोजी बग्गा यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यावर पंजाब पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. बग्गा यांनी 'द कश्मिर फाईल्स ' चित्रपटाविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका केली होती. बग्गा यांनी केजरीवाल यांना ते कश्मिरी पंडितांच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. त्यावरुन गुन्हा दाखल झाल्यानंतर पंजाब पोलिस बग्गा यांना अटक करण्यासाठी गेले होते.

मात्र या अटकेवरुन मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांच्या अटकेवरुन तीन राज्यांचे पोलिस कामाला लागले होते. त्यांना पंजाबला घेऊन जात असतानाच हरियाणा पोलिसांनी पंजाब पोलिसांना कुरुक्षेत्रमध्ये अडवले होते. त्यानंतर त्यांनी तेजिंदर यांची सुटका करून त्यांना दिल्ली पोलिसांसोबत दिल्लीकडे पाठवले. या दरम्यान बग्गा यांच्या वडीलांच्या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT