NCP-BJP
NCP-BJP Sarkarnama
देश

"भाजपला सोबत घेतले म्हणून 'राष्ट्रवादी'चं कोणतंही नुकसान नाही"

उमेश भांबरे

सातारा : सातारा आणि सांगली या जिल्ह्यांच्या जिल्हा बँकांच्या निवडणूका काल पार पडल्या. मात्र या निवडणूकीत उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे या भाजपच्या नेत्यांना घेऊन राष्ट्रवादीने पॅनेल केल्यामुळे पक्षाचे नुकसान झालं असल्याची चर्चा कालपासून साताऱ्यात होत आहे, मात्र भाजपला सोबत घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे कोणतेही नुकसान झाले नाही, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी स्पष्ट केले आहे. तसेच येत्या १५ दिवसांत जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा केल्यानंतर बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बाळासाहेब पाटील म्हणाले, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड (Election of District Bank Chairman) येत्या १५ दिवसांत होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मी त्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. तसेच पक्षातील नेत्यांशी चर्चा करून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे नाव निश्चित केले जाईल. शरद पवार यांनी मला सहकार, पणन मंत्रिपद दिलेले आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी मी इच्छुक नसल्याचेही बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे नाराज असून, यापुढे शिवसेना जिल्ह्यात स्वबळावर लढेल, असे त्यांनी सांगितले आहे. याबाबत त्यांच्या पक्षाची भूमिका वेगळी आहे. ते निर्णय घेऊ शकतात, असेही बाळासाहेब पाटील यांनी नमूद केले.

तसेच या निवडणूकीत उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे या भाजपच्या नेत्यांना घेऊन राष्ट्रवादीने पॅनेल केल्यामुळे पक्षाचे नुकसान झाले आहे. अशी चर्चा कालपासून साताऱ्यात होत आहे. याबाबात मंत्री पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यात विविध ठिकाणी जिल्हा बँक निवडणुकीत स्थानिक पातळीवर पक्षविरहित निर्णय घेऊन काही पक्ष एकत्र येऊन लढले. त्यानुसार साताऱ्यातही निर्णय घेतला. इथेही भाजप नेत्यांना राष्ट्रवादीने सहकार पॅनेलमध्ये सामावून घेतल्यामुळे पक्षाचे कोणतेही नुकसान झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT