Covid-19 Compensation Sarkarnama
देश

कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 50 हजारांची भरपाई

सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला मृतांच्या नातेवाईकांना भरपाई देण्याबाबत धोरण ठरवण्याचे आदेश दिले होते.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : कोरोना संसर्ग होऊन मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची भरपाई राज्य सरकारकडून दिली जाणार आहे. केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात बुधवारी ही माहिती दिली. यापूर्वी कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांसह यापुढे मृत्यू होणाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही ही भरपाई दिली जाणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला मृतांच्या नातेवाईकांना भरपाई देण्याबाबत धोरण ठरवण्याचे आदेश दिले होते. पण सुरूवातीला केंद्र सरकारनं भरपाई दिल्यास राज्यांवर मोठा आर्थिक बोजा पडेल, असं न्यायालयात सांगितलं होतं. पण न्यायालयानं सरकारला धोरण निश्चित करण्याचे सांगत भरपाई देण्याचे आदेश दिले. त्यानुसार केंद्र सरकारने प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतल्याचे बुधवारी न्यायालयात सांगितले.

ही भरपाई संबंधित राज्य सरकारच्या आपत्ती निधीतून दिला जाईल. जिल्हा आपत्ता व्यवस्थापन प्राधिकरण किंवा जिल्हा प्रशासनावर भरपाई देण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी राहणार आहे, असं केंद्र सरकारनं न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

भारतामध्ये जानेवारी 2020 पासून आतापर्यंत कोरोनामुळे सुमारे 4 लाख 45 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना ही भरपाई मिळणार आहे. तसेच यापुढेही कोरोना साथीच्या काळात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांनाही भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालायच्या नियमावलीनुसार मृत्यूचे कारण कोरोना असल्याचे स्पष्टपणे नमूद असावे, असे केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

भरपाईसाठी मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून दिला जाणारा अर्ज भरून द्यावा लागेल. त्यासोबत मृत्यूचे कारण नमूद असलेली कागदपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. जिल्हा प्रशासनाकडून अर्जांची पडताळणी, मान्यता, वितरण आदी बाबी केल्या जातील. ही भरपाई आधारशी लिंक असलेल्या बँकेत थेट जमा केली जाईल. अर्ज केल्यापासून 30 दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असं प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT