Nishant Nitish Kumar Sarkarnama
देश

Nitish Kumar News : नितीश कुमार दहाव्यांदा CM बनल्यानंतर बापलेकाची पहिली भेट; बिहारसह देशाचं मन जिंकलं... Video व्हायरल

Nitish Kumar son Nishant Video : CM निवासस्थानी वडील नितीश कुमार आल्यानंतर निशांत यांनी त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. पण वडिलांनी त्यांना अडविले.

Rajanand More

Nitish Kumar social media trends : अत्यंत साधे राहणीमान, कोणताही बडेजाव नाही, घराणेशाहीच्या रावणापासून चार हात लांब असलेल्या नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून गुरूवारी दहाव्यांदा शपथ घेतली. मागील अनेक वर्षांपासून राजकारणात असलेल्या नितीश कुमार यांच्यावर बिहारवासियांचे अजूनही एवढे प्रेम का, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आणि त्यांच्या मुलाकडे पाहून मिळते. वडील इतकी वर्षे मुख्यमंत्री असूनही मुलगा निशांत यांनी कधीही रूबाब दाखविला नाही. त्याचीच प्रचिती गुरूवारीही आली.

नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही वेळाने ते मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. तिथे निशांत त्यांच्या स्वागताला हजर होते. ते शपथविधी सोहळ्यालाही पहिल्या रांगेत बसले होते. शुभेच्छांचा स्वीकार करताना दिसत होते. त्यांचा पेहरावही अत्यंत साधा होता. शपथविधीनंतर वडिलांच्या स्वागतासाठी ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले.

निवासस्थानी वडील नितीश कुमार आल्यानंतर निशांत यांनी त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. पण वडिलांनी त्यांना अडविले. निशांत पाया पडण्याचा प्रयत्न करत होते. पण नितीश कुमार यांनी एका हाताने लेकाला रोखून धरले होते. नितीश कुमार यांनी नंतर दोन्ही हातांनी लेकाच्या खांद्यावर थाप मारली अन् दोघांमधील मनमोकळा संवाद सुरू झाला.

दोघांमधील या भावनिक क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दोघांमधील साधेपणाने बिहारचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे मन जिंकल्याचा भावना समाजमाध्यमातून व्यक्त केल्या जात आहेत. निशांत हे राजकारणापासून दूर आहेत. वडिलांच्या संयुक्त जनता दल या पक्षाचे कोणतेही पद त्यांच्याकडे नाही. विधानसभा निवडणुकीदरम्यान मात्र त्यांनी प्रचार केला होता.

राजकारणात अनेक नेते आपल्या नातेवाईकांना पदं देण्यासाठी सरसावलेले असतात. पण नितीश कुमार यांनी निशांत यांना त्यापासून दूर ठेवले. मुळात ५० वर्षीय निशांत यांनाच राजकारणाकडे फारसा ओढा नाही. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मीडियाशी बोलताना निशांत म्हणाले, मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेतल्याबद्दल मी वडिलांचे अभिनंदन केले. तसेच आम्हाला विजयी केल्याबद्द्ल बिहारमधील जनतेचेही आभार मानतो. मी देवाचेही आभार मानतो.

एनडीएला एवढ्या जागा मिळतील, अशी अपेक्षा नसल्याचे सांगताना निशांत म्हणाले, आमचा विजय होईल, हा विश्वास होता. पण लोकांनी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त विश्वास दाखविला. मागीलवेळी आमच्या पक्षाला केवळ ४३ जागा मिळाल्या होत्या. पण माझे वडील काम करत राहिले आणि लोकांनी यावेळी त्यांना भरभरून प्रेम दिल्याचे निशांत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT