Who is the new CM of Bihar 2026: नितीशकुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे केंद्रीय निरीक्षक शिवराजसिंह चौहान, प्रभारी विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सम्राट चौधरी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. बुधवारी (15 एप्रिल) रोजी संध्याकाळी त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
नितीशकुमार यांनी मंगळवारी (14 एप्रिल) सकाळी 11 वाजता अत्यंत भावनिक वातावरणात मंत्रिमंडळाची अखेरची बैठक घेतली. त्यानंतर अत्यंत जड अंतःकरणाने राज्यपाल लेफ्टनंट जनरल सैयद अता हसनैन (सेवानिवृत्त) यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दल-भाजप युतीला दणदणीत बहुमत मिळाले. त्यानंतर सहा महिने ते मुख्यमंत्रीपदावर राहिले.
नितीशकुमार यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय निरीक्षक शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता एनडीएच्या आमदारांची बैठक पार पडली. यात विजय सिन्हा, मंगल पांडे आणि दिलीप जयस्वाल यांनी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून सम्राट चौधरी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. सर्वानुमते हा प्रस्ताव मान्य झाला आणि चौधरी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. चौधरी संध्याकाळी राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहेत.
दोन उपमुख्यमंत्री :
उपमुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत यांना प्रस्ताव दिला होता. पण त्यांनी नकार दिला. त्यानंतर सरायरंजनचे आमदार, नितीश कुमार यांचे निकटवर्तीय विजय कुमार आणि जेडीयूचे ज्येष्ठ नेते सुपौलचे आमदार बिजेंद्र प्रसाद यादव यांचे नाव फायनल झाल्याची माहिती आहे. उद्या (बुधवार) मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु आहे, शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे.
नितीशकुमार यांनी सर्वाधिक काळ म्हणजे जवळपास 20 वर्षे बिहारचे मुख्यमंत्री भूषवले. कधी राजदसोबत, तर कधी भाजपसोबत ते मुख्यमंत्रीपदावर कायम होते. त्यांनी गत महिन्यात वयाची 75 वर्षे पूर्ण केली. त्यावेळी त्यांनी राज्यसभा सदस्य होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांनी राज्यसभा निवडणुकीत विजयही मिळवला. त्यांनी नुकतेच राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.