नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अखेर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत भाजपबरोबर (BJP) पुन्हा एकदा काडीमोड घेतला. हे अपेक्षितच होते अशी प्रतिक्रिया पक्षाच्या केंद्रीय वर्तुळात उमटली. नितीशकुमार यांचा डोळा आता पंतप्रधानपदावर असून भाजपविरोधी आघाडीतर्फे 2024 च्या लोकसभा रणधुमाळीत पंतप्रधानपदाचे संयुक्त उमेदवार म्हणून घोषित करण्यासाठी त्यांची सारी धडपड चालू असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
नितीशकुमार यांचे अमित शहा (Amit Shah) यांच्याबरोबर न पटल्याने त्यांनी वेगळा मार्ग चोखाळला आहे. असे राजकीय वर्तुळात सांगितले जात असले तरी प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर नितीशकुमार बिहारमधील आघाडी तोडतात हा इतिहास आहे, असे भाजप नेते सांगतात. शहा यांच्याबरोबर त्यांचे फाटणे हे या राजकीय घडामोडींचे तत्कालिक कारण असू शकते. मात्र, ते एकमेव कारण नाही. नितीशकुमार यांनी नुकत्याच झालेल्या निती आयोगाच्या बैठकीला दांडी मारली, तेव्हाच ते आता वेगळ्या मार्गाने जाणार, अशी चर्चा 6 दीनदयाळ मार्गावरील भाजप मुख्यालय परिसरात सुरू झाली होती.
बिहारमध्ये ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावरून नितीशकुमार यांनी भाजपला टाटा करण्याचे पहिले अस्त्र बाहेर काढले होते. त्यावेळी बिहारमधील सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पंतप्रधानांना भेटल्यानंतर ते आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यातील जवळीक वाढत गेल्याची चर्चा गेली दीडेक वर्ष होत्याच. राजदचे 79 आणि संयुक्त जनता दलाचे 45 अशा आमदार संख्येला काँग्रेस आणि डावे पक्ष यांचीही साथ मिळणार असल्याने बिहारमधील आगामी सरकार संख्याबळाच्या आघाडीवर तरी भक्कम वाटत आहे.
भाजप नेते रविशंकर प्रसाद सोमवारी लोकसभेतून बाहेर पडले, तेव्हा बिहारमध्ये काय चालले आहे असे विचारले. रविशंकर प्रसाद यांनी आभाळाकडे हात करून, जो भी होता है.... एवढेच म्हटले! आपण आपल्या निवासस्थानी जात आहोत असे सांगणारे रविशंकर प्रसाद यांची गाडी नंतर थेट विमानतळाकडे गेली. तेथून ते पाटण्याला गेले. संसद परिसरात अन्य एका भाजप नेत्याने, 'ज्यांना जिकडे जायचे ते जाऊ शकतात. ही लोकशाही आहे' असे सूचक वक्तव्य केले. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अलीकडेच पाटण्यात बोलताना प्रादेशिक पक्ष लवकरच संपतील, असे जे विधान केले त्याच वेळेला भाजप नेतृत्वाकडे नितीशकुमार वेगळ्या वाटेवर जात असल्याचे फीडबॅक आले होते.
शहा यांच्या दूरध्वनिलाही त्यांनी दाद दिली नाही. तेव्हा त्यांचा रस्ता स्वतंत्र झाल्याचे स्पष्ट झाले. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले. राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम टाळून संसदेबाहेर निघालेल्या बिहारमधील दुसऱ्या एका पक्षनेत्याने पत्रकारांशी बोलताना, नितीश कुमार यांनी काहीही निर्णय घेतला तरी भाजपला फरक पडणार नाही. बिहारमध्ये तर नाहीच नाही, असा विश्वास व्यक्त केला. तेव्हा तेही पाटण्याकडेच निघालेले होते.
नितीशकुमार यांनी आज भाजपबरोबरचा घरोबा अधिकृतरीत्या मोडल्यावर रविशंकर प्रसाद यांच्या पाटण्यातील निवासस्थानी माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशीलकुमार मोदी आणि भाजप नेतृत्वाने खास बिहारमध्ये पाठवलेले शहानवाज हुसेन यांच्यासह वरिष्ठ भाजप नेत्यांच्या बैठका सुरू आहेत.
एनडीए ची वजाबाकी सुरू...
नितीशकुमार भाजप आघाडी म्हणजे एनडीए आणखी आकुंचन पावली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि अकाली दल यापूर्वीच बाहेर गेल्याने जदयू बाहेर गेल्यावर एनडीएमध्ये मोठा असा एकही पक्ष उरलेला नाही. भाजप सरकारच्या काळात बिहार बदलला आहे. तरुणांच्या डोळ्यात रोजगाराची चमक आहे, महिलांच्या डोळ्यात असेच आणि विश्वासाचा किरण आहे, असे सांगणारे शहानवाज हुसेन यांच्यासारखे भाजप नेते, ताज्या घडामोडींवर मात्र नितीश कुमार यांचा निशाणा आणि निगाहे हे वेगवेगळे असल्याचे सांगतात.
वादग्रस्त ठरलेले राज्यपाल जगदीप धनकड यांना पश्चिम बंगालमधून हलवल्यानंतर ममता बॅनर्जी यांचे मोदी सरकारबाबत सूर बदलले आहेत. या स्थितीत 2024 मध्ये भाजप विरोधकांतर्फे पंतप्रधानपदाचे संयुक्त उमेदवार म्हणून एक मान्यता मिळवण्याची नितीशकुमार यांची धडपड आहे, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.