नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये संसदेजवळ असलेल्या नॉर्थ ब्लॉक इमारतीत आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे दाट लोट दिसून आले. घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला आगीची माहिती मिळाल्यानंतर 6 अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना करण्यात आल्या. दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार, आग नियंत्रणात आणण्यात आली आहे.
नॉर्थ ब्लॉकच्या छतावरील एसी यंत्रणेच्या बॉयलरमध्ये आग लागल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. इमारतीच्या छतावर वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दिल्ली अग्निशमन दलाला नॉर्थ ब्लॉकमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच बचावकार्य आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी पथके रवाना करण्यात आली. घटनास्थळी पोहोचून अग्निशमन कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. आगीमुळे इमारतीत किंवा परिसरात किती नुकसान झाले, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.