नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराने आता डोके वर काढलं आहे. देशातल्या 11 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. राज्यातील दररोजची कोरोना रुग्णसंख्या सध्या साडेसाहजार आहे. डेल्टाच्या जागी आता ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे तिसरी लाट (Third Wave) पुढील वर्षाच्या सुरवातीला येईल, अशी माहिती नॅशनल कोविड-19 सुपरमॉडेल कमिटीने केंद्र सरकारला दिली आहे.
या समितीचे अध्यक्ष हे विद्यासागर हे आहेत. त्यांनी म्हटले आहे की, भारतात ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. परंतु, ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल. तिसरी लाट भारतात पुढील वर्षीच्या सुरवातीला येईल. ही लाट फेब्रुवारी महिन्यात उच्चांकी पातळीवर पोचेल. सध्या देशात दररोज कोरोनाचे साडेसात हजार रुग्ण सापडत आहेत. डेल्टाच्या जागा ओमिक्रॉनने घेतल्यानंतर ही संख्या वाढेल.
विद्यासागर हे आयआयटी हैदराबादचे प्राध्यापक आहेत. ते म्हणाले की, दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या जास्त असणार नाही. कारण की सरकारने सामान्य नागरिकांना 1 मार्चपासून कोरोना लस देण्यास सुरवात केली. त्याचवेळी नेमका डेल्टाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग सुरू होता. म्हणजेच जनतेचे लसीकरण झालेले नव्हते त्यामुळे डेल्टाचा प्रादुर्भाव झाला होता. आता लसीकरणाचे प्रमाण खूप असल्याने रुग्णसंख्या पहिल्या लाटेपेक्षा कमी राहील. प्रौढांपैकी 85 टक्के जणांना पहिला डोस आणि 55 टक्के जणांना दोन्ही डोस दिलेले आहेत.
ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी बूस्टर डोस देण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. जगभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना लशीचे दोन डोस दिले जात आहे. काही देशांमध्ये आता कोरोनापासून बचावासाठी बूस्टर डोस दिला जात आहे. भारतातही तो देण्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे. लहान मुलांना कोरोना लस देण्याबाबतही त्याचवेळी निर्णय जाहीर होईल. बूस्टर डोस देण्याबाबतचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचे काम सरकारी पातळीवर सुरू असून, याची सुरवात जानेवारीपासून होण्याची शक्यता आहे.
देशातील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या मागील 24 तासांत शंभरावर पोचली आहे. ओमिक्रॉन रूग्णांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात आहे. शंभरपैकी 40 रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. राजधानी दिल्लीत 22 रूग्ण आहेत. तर राजस्थानमध्ये 17 जणांना ओमिक्रॉनची बाधा झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. वाढत्या रुग्णसंख्येबाबत आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त करीत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.