पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धसदृश्य वातावरणात काश्मीर या पृथ्वीचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या प्रदेशाविषयी जाणून घेण्याची इच्छा अनावर झाली आणि बलराज पुरी लिखित व संजय नहार अनुवादित सरहद प्रकाशनाचे ‘काश्मीरची ५००० वर्षे’ हे पुस्तक हातात पडले. आर्य आणि वेदकालापूर्वी जन्माला आलेल्या आपल्या काश्मीर या प्रदेशाने स्वतःच्या विशिष्ट अशा गुणधर्मासह वैदिक समाजात प्रवेश केला.
बौद्ध हा नवा धर्म स्वीकारल्यानंतर काश्मीरने त्यात महायानाच्या स्वरूपात स्वतःची भर घातली. त्यानंतर इस्लाममध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने आपल्या इस्लामपूर्व चालीरीती कायम ठेवल्या. काश्मीरने सतत नवनव्या संकल्पना स्वीकारल्या. पण त्या संकल्पनांना आपल्या परंपरेचा भागही बनवले. या पुस्तकातील लेख काश्मिरी सभ्यता, संस्कृती, संकल्पना, वंश आणि जमातींच्या विकास प्रक्रियेचे बारकावे मांडतात.
हे लेख काश्मिरी मन आणि समाज समजून घेण्याकरिता आपल्याला एक सूत्रही सांगतात. हे पुस्तक प्रामुख्याने इन्स्टिट्यूट आॅफ जम्मू ॲँड काश्मीर अफेअर्स या संस्थेने नव्वदच्या दशकात श्रीनगर येथे आयोजित ‘काश्मीरची पाच हजार वर्षे’ या विषयावर आयोजित परिसंवादात वाचल्या गेलेल्या निबंधावर आधारलेले आहे.
या परिसंवादास शंभरपेक्षा अधिक काश्मिरी विद्वान, समाजशास्रज्ञ, लेखक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर हजर होते. खरे म्हणजे हा परिसंवाद नेमक्या काश्मीरमध्ये सशस्त्र बंडखोरी सुरू झाली तेव्हाच झाला होता. त्यामुळे तिथे मुक्त, खुली व मैत्रीपूर्ण चर्चा करण्यात आयोजकांना कसलीही अडचण आली नाही. नंतरच्या काळातील घडामोडींमुळे हे निबंध लेखन एकत्र करण्यात लेखकाचा बराच काळ गेला, काही निबंध नंतर समाविष्ट करण्यात आले. नंतरच्या पोस्ट मॉडर्न विचारांमध्ये स्वतंत्र ओळख व स्वातंत्र्य या दोन्हीबद्दलच्या उर्मींना मानवाच्या सर्वात मूलभूत उर्मी म्हणून मान्यता मिळालेली आहे.
माहिती व ज्ञानाचा विस्फोट, राजकीयीकरण, विकास व संपर्क क्षेत्रातील क्रांती या सर्वांचा समावेश असलेल्या आधुनिकतेच्या प्रक्रियेमुळे सगळीकडेच या उर्मींना तीव्र धार आलेली आहे. भारतीय उपखंड व जगाच्या काही भागात झालेला वांशिक उद्रेक, साम्यवादी देशांचा गट आणि सोविएत रशियाचा पाडाव या गोष्टी या उर्मीचा पुरावा आहेत.काश्मीरच्या बाबतीत ही ओळख जास्त धारदार आणि जुनी आहे. कारण काश्मीर ही ५००० वर्षांपासून सलग अस्तित्व असलेली जिवंत संस्कृती आहे. या पुस्तकात सामान्य प्रथेप्रमाणे राजेमहाराजे आणि राजघराण्यांचे उदयास्त यांचा इतिहास वर्णन केलेला नाही.
पुस्तकात ‘कशीर आणि कोशुर किंवा काश्मीर आणि काश्मिरी’ (लेखक जी एम डी सुफी), काश्मीरच्या भूमीचे व लोकांचे मूळ (पी एम के बामझाई), काश्मीरची उत्पत्ती (फिदा एम हसनैन), प्रागैतिहासिक काश्मीर-बुर्झहोमा (एम एल साकी), नीलमतपुराण (वेदकुमार घई), त्रिका शास्त्र- काश्मीरचे मूलभूत तत्वज्ञान (प्रेमनाथ बजाज), काश्मिरातील बौध्द धर्म (रामनंदन सिंग), काश्मिरता वाक्-शृक स्वभाव (पी एन पुष्प), काश्मिरी शिवोपासना आणि सूफी पंथ (अब्बास रिझवी), काश्मीरचे इस्लामीकरण (मोहंमद इशाक खान), काश्मीर- इस्ला, विचारप्रणाली आणि समाज (पीर गुयासुद्दीन), परकीय सत्तेखालील काश्मीर (सैफुद्दीन सोझ) काश्मिरीयतः मानववंशाचे गूढ (रियाज पंजाबी) आणि काश्मीरची ५००० वर्षे (बलराज पुरी) या प्रकरणांतून या प्रदेशाचा पाच हजार वर्षांचा राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
काश्मीरच्या सांस्कृतिक परंपरेचा वेध घेताना पुरी यांच्या लेखात म्हटले आहे की काश्मीर हे केवळ भारतातीलच नव्हे तर पृथ्वीवरील नंदनवन एकांतवासात राहिले आहे. येथील संस्कृती एकजीव आहे. कारण येथील जनता ९४ टक्के मुसलमान आहे तर ८९ टक्के पेक्षा जास्त लोकांची मातृभाषा ‘काश्मिरी’ आहे. हे लोक त्यांच्या भाषेला ‘कशुर’ म्हणतात. लल देद ही काश्मिरातील सर्वात जुनी कवयित्री आहे असे मानले तर या भाषेला ६०० वर्षांचा नोंद झालेला वाड्ःमयीन इतिहास आहे. भारतीय भाषांतील पहिले अधिकारी व्यक्ती सर जॉर्ज ग्रिअरसन यांच्यामते काश्मिरी भाषेचे मूळ सर्व उत्तर भाषांची जननी असलेल्या संस्कृतमध्ये नाही तर ते दर्दी भाषेत आहे. काश्मिरी संस्कृती मोहेंजोदारो संस्कृतीशी समकालिन असली तरी तिची काही स्वतंत्र वैशिष्ट्येही आहेत.
स्वतःला काश्मीरच्या इस्लामपूर्व आध्यात्मिक परंपरेच्या वारशाचा कळसाध्याय ज्यांना समजले जाते त्या लल देद हिचा आध्यात्मिक वारस असल्याचे घोषित करणाऱ्या नंद ऋषींनी हा वारसा त्यांच्या ऋषी परंपरेमार्फत पुढे चालवला. भारतातील वैदिक व वेदोत्तर काळामध्ये इस्लामपूर्व काश्मीरच्या खुणा सापडतात. काश्मिरी मुसलमान हे काश्मिरीही राहिल व मुसलमानही राहिले. उर्वरित भारतीय मुस्लिम लोकांना जसे ज्याप्रमाणे अधूनमधून इस्लामी जवळीक आणि स्थानिक देशप्रेमाच्या संबधात दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाचे झटके येतात तसे ते काश्मिरींना येत नाहीत. कारण काश्मीर हे अनेक कल्पना व वंशाचे एकत्र येण्याचे स्थान आहे.
सुफी यांचे निरीक्षण असे आहे की बुद्धाची तत्वप्रणाली, वेदांतची शिकवणूक, आणि इस्लामचा अध्यात्मवाद यांना एकापाठोपाठ काश्मीरमध्ये स्थान मिळाले. काश्मीरने बौद्ध, हिंदू धर्म व इस्लाम यांच्यातले सर्वोत्तम ते सर्व काही आत्मसात केले. आणखी एक अभ्यासक जी टी व्हिने यांची अपेक्षा अशी होती की काश्मीर पुन्हा एकदा आशियायी संस्कृतीचा केंद्रबिंदू बनेल. जणू आशिया खंडातील छोटे इंग्लंड.
शेवटी या पुस्तकात पुरी यांनी ही काश्मिरियत जिवंत कशी राहू शकेल, याबाबत विवेचनही केले आहे. येथील तरूण वर्गाला अगतिक करून सोडणारे व शस्त्र हातात घ्यायला प्रवृत्त करणारे घटक कोणतेही असोत. महत्वाचा प्रश्न आहे की यामुळे उपखंडातील एका अत्यंत सुसंस्कृत समुदायाचे चारित्र्य बदलणार तर नाही ना? काश्मिरियतमध्ये दोन धर्मामध्ये जी तयार झाली आहे ती सांधली गेली नाही तर काश्मिरियत जिवंत राहिल का? अशा प्रश्न शेवटी उपस्थित करण्यात आला आहे.
लेखक - बलराज पुरी,
अनुवादः संजय नहार
प्रकाशक - सरहद, पुणे
किंमत - १५० रुपये
पृष्ठे - १४४
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.