Modi petrol pump
Modi petrol pump Sarkarnama
देश

१३७ दिवसांनंतर एकाच फटक्यात पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा तिहेरी दणका; विरोधक आक्रमक

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशांतील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीमुळे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर मागील चार महिन्यांहून अधिक काळ स्थिर होते. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या (Crude Oil) भावाचा भडका उडूनही पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ टाळली होती. मात्र आता निवडणुकीनंतर सर्वसामान्य ग्राहकांना एकाच दिवसात तिहेरी दणका बसला आहे. तब्बल १३७ दिवसांनंतर आजपासून पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी गॅस दरवाढीचा दणका बसणार आहे.

काल घाऊक ग्राहकांसाठीच्या डिझेलच्या दरात प्रतिलिटर तब्बल 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापाठोपाठ आता आजपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ८० पैसे वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९६.२१ रुपये झाला असून, डिझेलचा दर ८७.४७ रुपये आहे. याचवेळी स्वयंपाकाचा गॅस (LPG) सिलिंडरच्या दरातही प्रति सिलेंडर ५० रुपये वाढ करण्यात आली आहे. ६ ऑक्टोबर २०२१ नंतरची ही पहिली दरवाढ आहे. यामुळे आगामी काळात सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

देशात महागाईचा भडका उडाल्याने निवडणुकांच्या तोंडावर मागील वर्षी मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly Elections) असल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. पेट्रोलियम कंपन्यांकडूनही दरवाढ थांबवण्यात आली होती. मात्र आता या निवडणुका संपल्या असून, या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका उडण्याचा अंदाज आहे. पेट्रोलचा दर प्रतिलिटर १२ ते २५ रुपये वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान या दरवाढीविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले असून आम आदमी पक्ष, काँग्रेस यांनी मोदी सरकारव टीका केली आहे. आम आदमी पक्षाने ट्विट करत म्हंटले आहे की, गॅस ५० रुपयांनी महाग, डिझेल २५ रुपयांनी महाग, पेट्रोल ११० रुपयांच्या पार. सांगा मित्रांनो देशाचा जीडीपी वाढत आहे की नाही? तर काँग्रेसने ट्विट करत टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, निवडणुका संपताच मोदी सरकारचे जनतेवर अत्याचार सुरू झाले. आधी घाऊक डिझेलची दरवाढ करुन महागाई वाढवली, आता एका दिवसातच पेट्रोल-डिझेलचे भाव ८० पैशांनी वाढवले, तर घरगुती गॅसचा ५० रुपयांनी भडका उडाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT