India-Pakistan Diplomatic:पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारच्या सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक झाली. बैठकीनंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी सीमेपलीकडील संबंधांचे पुरावे सापडले असल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले. पाकिस्तानशी कुठलाही राजशिष्टाचार, जनसंपर्क आदी संबध भारताने तोडल्याचे त्यांनी सांगितले आहे. सीमेपलीकडून ज्या ठिकाणाहून भारतात येत होते ती अटारी सीमाही बंद केली आहे.
अटारी येथील सीमा (तपासणी चौकी - ICP) भारताने बंद केली आहे. व्हिसा घेऊन भारतात येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची ये-जा पूर्णपणे थांबली आहे. जे लोक वैध मार्गाने सीमा ओलांडून आले आहेत, त्यांना 1 मे 2025 पर्यंत त्या मार्गाने परत जाण्याची मुभा आहे. ही सीमा दोन्ही देशांमधील व्यापार आणि लोकांच्या प्रवासासाठी महत्त्वाचा मार्ग होती.
सीमा बंद झाल्याने द्विपक्षीय व्यापारावरही थेट परिणाम होणार आहे.वैद्यकीय आणि शैक्षणिक कारणासाठी पाकिस्तानींनाही येत्या 48 तासांत भारत सोडावा लागणार आहे. सार्क व्हिसा योजनेबाबत सर्वात मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी अनेक पाकिस्तानी कलाकार आणि सेलिब्रिटी भारतात येत असत.
सार्क व्हिसा योजना समजून घ्या भारताने सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES)पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेले सर्व व्हिसा रद्द केले आहेत. या योजनेअंतर्गत मल्टी एन्ट्री व्हिसा मिळत होता, ज्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना अटारी-वाघा सीमेवरून किंवा हवाई मार्गाने भारतात येण्याची परवानगी होती.
सिंगल व्हिसा एन्ट्री अंतर्गत केवळ अटारी सीमेवरूनच प्रवेश दिला जात होता. पण मल्टी एन्ट्री व्हिसाअंतर्गत पाकिस्तान दुबई किंवा इतर देशांतून विमानाने भारतात येत असे. आता या योजनेअंतर्गत एकही पाकिस्तानी भारतात येऊ शकणार नाही. एसव्हीईएस व्हिसा धारक आणि सध्या भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ज्या पाकिस्तानी नागरिकांकडे विद्यार्थी, वैद्यकीय किंवा व्यवसाय यासारखे इतर व्हिसा आहेत. त्यांनाही भारत सोडावा लागणार आहे. हे लोक अटारी-वाघा सीमेवरून आले आहेत, त्यांना याच मार्गाने पाकिस्तानात जावे लागणार आहे. आता एकही पाकिस्तानी या मार्गाने भारतात येऊ शकणार नाही. सरकारची भूमिका अत्यंत कडक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना ‘Persona Non Grata’ घोषित करण्यात आले आहे. त्यांना आठवडाभरात भारत सोडून जावे लागणार आहे. इस्लामाबादमधील उच्चायुक्तालयातील संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना माघारी बोलावण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. दोन्ही देशांच्या उच्चायुक्तालयातील ही पदे आता रद्द करण्यात आली आहेत. दोन्ही देशांच्या उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ५५ वरून ३० करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.