panic at kabul airport after threat of isis attack 
देश

काबूल विमानतळावर इसिसच्या हल्ल्याची भीती; अमेरिकेसह इतर देशांची बाहेर पडण्याची घाई

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता स्थापन केली असून, हजारो नागरिक देश सोडून पलायन करू लागले आहेत. काबूलच्या विमानतळावर हजारो नागरिकांनी गर्दी केली आहे.

वृत्तसंस्था

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) सत्ता स्थापन केली असून, हजारो नागरिक देश सोडून पलायन करू लागले आहेत. काबूल विमानतळावर (Kabul Airport) कधीही इसिसचा (ISIS) हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. यामुळे 31 ऑगस्टच्या अंतिम मुदतीआधी जास्तीतजास्त नागरिकांनी तेथून बाहेर काढण्याचा अमेरिकेसह (USA) इतर देशांचा प्रयत्न आहे. दरम्यान, हल्ल्याच्या भीतीमुळे अमेरिकेने नागरिकांना विमानतळापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. 

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर 11 दिवसांपासून अमेरिका आणि इतर देश नागरिकांना तेथून बाहेर काढत आहेत. इतिहासातील ही अशा प्रकारची सर्वांत मोठी मोहीम ठरली आहे. आतापर्यंत काबूलमधून 88 हजार नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. काबूल विमानतळावरुन दर 39 मिनिटांनी अमेरिकेचे लष्करी विमान बाहेर पडत आहे. कागदपत्रांची योग्य तपासणी करुनच नागरिकांना बाहेर जाऊ देण्याची अट आधीच तालिबानने घेतली आहे. 

एखाद्या गर्दीच्या बसस्थानकासारखी काबूल विमानतळाची अवस्था झाली आहे. हजारो नागरिकांचे लोंढे विमानतळावर येत आहेत. परंतु, देश सोडून बाहेर जाण्यासाठी विमानात बसण्यास अनेकांना जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. अफगाणिस्तानमध्ये शिल्लक असलेले अमेरिकी सैनिक विमानतळाची अंतर्गत सुरक्षा करीत आहेत. तालिबानी सुरक्षारक्षक विमानतळाबाहेर सुरक्षेसाठी तैनात आहेत. तालिबानची सत्ता असलेल्या अफगाणिस्तानमध्ये राहण्यापेक्षा हजारो नागरिक देश सोडून पलायन करीत आहेत.   

तालिबान्यांनी अध्यक्षीय भवनावर कब्जा मिळवत अफगाणिस्तानात आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरादर अफगाणिस्तानचा नवा प्रमुख असू शकतो. तालिबान्यांनी 15 ऑगस्टला सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार घाबरले होते. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अध्यक्षीय भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला.

अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षांपासून असलेले अमेरिकेचे सैन्य तेथून परतल्यानंतर पुन्हा एकदा तालिबानने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अध्यक्ष बायडन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे संपूर्ण सैन्य माघारी बोलावण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत ठरवली होती. त्याआधी दोन आठवडे तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवला आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT