Parliament session news : संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रेस विरूध्द भाजप असा सामना दररोज पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. पण आज लोकसभेसह संसदेच्या आवारातही एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. लोकसभेत काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. गडकरींनीही काही सेकंदात त्यांची समस्या सोडवली. त्यानंतर त्यांच्या कार्यालयात प्रियांका यांना त्यांनी स्वत: बनविलेला खास पदार्थही खायला दिला.
लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना प्रियांका गांधी यांनी चंदीगड-शिमला महामार्गाबाबतचा प्रश्न उपस्थित केला. हा प्रश्न मांडल्यानंतर त्यांनी अचानक गडकरी यांना भेटीबाबत विनंती केली. सर, माझ्या मतदारसंघाशी संबंधित प्रश्नांबाबत जून महिन्यांपासून मी तुमच्या भेटीसाठी वेळ मागत आहे, अपॉईंटमेंट द्या, अशी विनंती प्रियांका गांधी यांनी हसत-हसत केली.
गडकरी यांनीही लगेच त्यांना उत्तर दिले. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर लगेच भेटायला या, माझे दरवाजे नेहमीच उघडे असतात. अपॉईंटमेंट घेण्याचीही गरज नसते, असे सांगतिले. त्यानंतर प्रियांका गांधींनीही हात जोडून त्यांचे आभार मानले. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर प्रियांका गांधी पक्षातील काही खासदारांसोबत गडकरी यांच्या भेटीला त्यांच्या दालनात गेल्या. गडकरींनी दिलेला शब्द पाळत त्यांना भेट देत प्रश्न जाणून घेतले.
दोघांच्या औपचारिक बैठकीत प्रियांका यांनी वायनाडमधील रस्त्यांच्या समस्यांबाबत गडकरींशी संवाद साधला. या चर्चेदरम्यान गडकरी त्यांना म्हणाले, ‘याआधी राहुल गांधींसोबत अमेठीतील रस्त्यांबाबत चर्चा केली होती. राहुलजींचे काम केले, आता तुम्हाचे नाही केले तर लोक म्हणतील भावाचे काम केले आणि बहिणीचे केले नाही.’ गडकरींच्या या मिश्कील टिप्पणीवर प्रियांका यांच्यासह उपस्थितांनीही हसून दाद दिली.
खास डिश
बैठकीदरम्यान गडकरी यांनी प्रियांका यांना न खातापिता जायचे नाही, असा आग्रह केला. गडकरी यांनी आज यूट्यूबवर पाहून तांदळाचा एक पदार्थ बनविला होता. त्यांनी प्रियांका यांना ही डिश खाण्याचा खास आग्रह केला. गडकरींच्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला आज हीच डिश दिली जात होती, असे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे.
काँग्रेस खासदाराची बोलती बंद
लोकसभेत आज काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुडा यांनी हरियाणातील महामार्गांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना गडकरी यांनी महामार्गांची सर्वाधिक कामे हरियाणात झाल्याचे आणि सुरू असल्याचे उत्तर दिले. हरियाणाच्या स्थापनेनतर जेवढी कामे झाली नसतील तेवढी कामे मागील ११ वर्षांत झाल्याचे सांगत गडकरी यांनी त्यांची बोलती बंद केली. सदस्यांना झालेल्या कामांचाही उल्लेख सभागृहात करावा, अशी अपेक्षाही गडकरी यांनी व्यक्त केली.
गडकरी यांनी पुढील काळाबाबतही सभागृहात महत्वाची माहिती दिली. आता राष्ट्रीय महामार्गांवर टोलनाक्यांवर नव्याने यंत्रणा उभारली जात आहे. याअंतर्गत टोल देण्यासाठी वाहनांना एक सेकंदही थांबावे लागणार नाही. नव्या यंत्रणेच्या माध्यमातून धावत्या वाहनाची नंबर प्लेट व फास्टॅगचे स्कॅनिंग होईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.