Queen Elizabeth  Sarkarnama
देश

धक्कादायक : ब्रिटनच्या युवराजांच्या अंत्यविधीआधी पंतप्रधानांच्या घरी झाली दारूपार्टी

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्याकडून लॉकडाऊनचा अनेक वेळा भंग झाल्याचे प्रकार समोर येत आहेत.

सरकारनामा ब्युरो

मेक्सिको सिटी : जगभरात कोरोना (Corona) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराचा संसर्ग वाढत आहे. ब्रिटनमध्ये (UK) यामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांवर बंधने असतानाच ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी मित्रांना बोलावून दारू पार्टी केल्यावरून गदारोळ सुरू आहे. आता युवराज फिलिप यांच्या अंत्यविधीआधीही अशीच पार्टी पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर सुरू असल्यामुळे एप्रिल 2021 मध्ये कडक लॉकडाऊन होते. त्यावेळी युवराज फिलिप यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीवेळी ब्रिटनची राणी एलिझाबेथ एकटीच बसल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. या छायाचित्रामुळे कोरोना महामारीची विदारकता आणि ब्रिटनमधील निर्बंध यावर चर्चा झाली होती. या अंत्यविधीला मोजक्याच लोकांना परवानगी होती. परंतु, या अंत्यविधीआधी काही तास ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या घरी दारूपार्टी सुरू होती. ही बाब समोर आल्याने आता देशभरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करीत आहेत. लॉकडाऊनचा भंग केल्याबाबत जॉन्सन यांनी देशाची माफी मागितली आहे. जॉन्सन यांनी संसदेत माफीनामा सादर करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढू लागला आहे. हा दबाव विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षासोबत जॉन्सन यांच्या हुजूर पक्षाकडून येत आहे. जॉन्सन यांच्या लॉकडाऊनमधील पार्टीमुळे जनक्षोभ उसळला आहे. जॉन्सन यांच्या जागी पंतप्रधानपदी कोण येणार याचीही चर्चा सुरू झाली आहे. हुजूर पक्षाच्या अनेक नेत्यांनी यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.

नुकताच पंतप्रधान जॉन्सन यांच्या खासगी सचिवाने पाठवलेला ई-मेल आता समोर आला होता. जॉन्सन यांच्या सुमारे 100 मित्र आणि सहकाऱ्यांना ई-मेल पाठवण्यात आला होता. या ई-मेलमध्ये तुमची दारू तुम्हीच आणा, असे म्हटले होते. ही पार्टी पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थान असलेल्या डाऊनिंग स्ट्रीटवरील गार्डनमध्ये झाली होती. विशेष म्हणजे देशात लॉकडाऊन असताना ही पार्टी झाली होती. ही पार्टी 2020 च्या नाताळमध्ये झाली होती. त्यावेळी देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे डाऊनिंग स्ट्रीटवर सातत्याने होणाऱ्या पार्ट्या चर्चेत आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT