peoples from haryana not taking covid 19 vaccine due to rumours
peoples from haryana not taking covid 19 vaccine due to rumours  
देश

धक्कादायक : कोरोना लशीला ते देताहेत नकार...म्हणताहेत, लशीत गाय अन् डुकराचे मांस

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येत आहे. हरियानातील नागरिक मात्र, या लशीला नकार देऊ लागले आहेत. यामागील कारणही धक्कादायक आहे. या लशीत गाई आणि डुकराचे रक्त आणि मांस वापरल्याची भीती त्यांना वाटत आहे. 

याबाबत हरियानातील पालवल येथील सुमारे 50 ते 60 नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि मुख्यमंत्री कार्यालयाला या महिन्याच्या सुरुवातीला पत्रही लिहिले आहे. आमची कोरोना लस घेण्याची इच्छा नाही. यात गाईचे रक्त मांस अथवा चरबी वापरलेली आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. अनेक नागरिक लशीला नकार देऊ लागल्याने लसीकरण मोहिमेवर परिणाम होत आहे.  
हरियानातील नूहमध्येही असाच प्रकार याआधी घडला होता. तेथेही अफवेमुळे नागरिक कोरोना लस घेण्यास नकार देत होते. कोरोना लशीमध्ये डुकराचे मांस असल्याची अफवा त्यावेळी पसरली होती. तसेच, लशीमुळे नंपुसकता येते, अशीही अफवा पसरली होती. 
जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत आहेत.

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT