petrol and diesel prices are stable for 24 days in india
petrol and diesel prices are stable for 24 days in india  
देश

पेट्रोल, डिझेलच्या दरात 24 दिवसांपासून बदल नाही पण सामान्यांच्या खिशाला कात्रीच!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. सलग 24 दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव घसरत असूनही दरात कपात होत नसल्याने सामान्यांच्या खिशाला बसणारी झळ कायम आहे. 

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकी पातळीवर आहेत. देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वाधिक महागडे आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 27 फेब्रुवारी रोजी वाढ झाली होती. त्यानंतर सलग 19 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव घसरु लागले आहेत. यामुळे तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणे अपेक्षित होते. मागील सात दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या भावात 6 टक्के घट होऊन तेलाचा भाव प्रतिबॅरल 64 डॉलरवर आला आहे. 

देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या दरात सलग 24 दिवसांपासून कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. कारण खनिज तेलाचे भाव वाढलेले असताना तेल कंपन्यांनी आधी दरवाढ केलेली नव्हती. त्यामुळे आता त्यांच्याकडून दरकपात होण्याची शक्यता नाही. तेल कंपन्या आधी झालेला तोटा भरुन काढण्यावर भर देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

प्रमुख महानगरांतील आजचे पेट्रोल, डिझेलचे दर (स्रोत : इंडियन ऑईल) 
दिल्ली : पेट्रोल - 91.17, डिझेल - 81.47 
मुंबई : पेट्रोल - 97.57, डिझेल - 88.60 
चेन्नई : पेट्रोल - 93.11, डिझेल - 86.45 
कोलकता : पेट्रोल 91.35, डिझेल - 84.35 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलने मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अनेक राज्यांत पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील महिन्यांत सलग 12 दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.63 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.84 रुपये वाढ झाली होती. 

पेट्रोलच्या दरात 27 फेब्रुवारीला प्रतिलिटर 15 पैसै वाढ झाली होती. त्यावेळी दिल्लीत पेट्रोल 91.17 रुपयांवर गेले. हा दिल्लीतील आतापर्यंतचा पेट्रोलचा सर्वाधिक दर आहे. याचवेळी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 97.57 रुपयांवर पोचला आहे. डिझेलचा दर दिल्लीत प्रतिलिटर 81.47 रुपये आणि मुंबईत 88.60 रुपयांवर गेला आहे. सलग 19 दिवस कोणतेही बदल न झाल्याने  हे दर कायम आहेत. 

गेल्या वर्षी एप्रिल/मे महिन्यात खनिज तेलाच्या भावाने आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन दशकांतील नीचांकी पातळी गाठली होती. त्यावेळी मोदी सरकारने महसूल वाढवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवला होता. या भाववाढीचा बोजा ग्राहकांवर पडत आहे. मात्र, सरकारने वाढवलेले कर कमी केलेले नाहीत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT