Petrol and Diesel Rates  Sarkarnama
देश

निवडणुका संपताच 24 तासांत जनतेला शॉक; पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने कापला खिसा

देशांतील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्या असून, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीस सुरवात झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या (Crude Oil) भावाचा भडका उडाला आहे. जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल 130 डॉलरवर पोचला आहे. देशांतील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर मागील तीन महिन्यांहून अधिक काळ स्थिर होते. निवडणुका संपताच जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा शॉक बसला आहे.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या पार पडल्यानंतर तेल कंपन्यांनी या राज्यांमधील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. उत्तर प्रदेशमधील महत्वाच्या शहरांत इंधनाचे दर निवडणूक संपताच 24 तासांत वाढले आहेत. उत्तर प्रदेशमधील नोएडा, लखनौबरोबरच बिहारची राजधानी पाटणा आणि हरयानामधील गुडगावमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे. देशातील प्रमुख चार महानगरांपैकी चेन्नई वगळता इतर तीन म्हणजेच दिल्ली, मुंबई आणि कोलकत्यात दरात बदल करण्यात आलेले नाहीत.

या शहरांत वाढले दर (प्रतिलिटर)

शहर पेट्रोल डिझेल

गुडगाव 95.68 86.90
नोएडा 95.64 87.14
जयपूर 107.06 90.70
लखनौ 95.29 86.81
पटना 106.26 91.43

पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवले असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. खनिज तेलाचा भाव आता प्रतिबॅरल 130 डॉलरवर गेला आहे. ही भावाची मागील 14 वर्षांतील उच्चांकी पातळी आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. असे असतानाही विधानसभा निवडणुकांमुळे हे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेलच्या दरांचा भडका उडण्यास सुरवात झाली आहे.

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले. यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly Elections) असल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. या निवडणुका संपल्या असून, या आठवड्यात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका उडणार आहे. पेट्रोलचा दर प्रतिलिटर 12 ते 25 रुपये वाढण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडूनही दरवाढ थांबवण्यात आली. मुंबईत पेट्रोलचा दर 109.98 रुपये आणि डिझेलचा दर 94.14 रुपये आहे.

उत्पादन शुल्क कमी केल्याने केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात 1.4 लाख कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्कावर पाणी सोडावे लागेल. गेल्या वर्षी देशात 3 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या होत्या. यात काही ठिकाणी भाजपला फटका बसला. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशमध्ये बसला होता. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीरपणे याचे खापर महागाईवर फोडले होते. याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे चारही उमेदवार पराभूत झाले होते. कर्नाटक आणि हरियानातील प्रतिष्ठेच्या लढतीततही भाजपला हार पत्करावी लागली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT